मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास, राज्यसभा उमेदवारीवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

MP sambhajiraje chhatrapati demand give 2 year chance who cross age limit for government job
मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास, राज्यसभा उमेदवारीवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर संभाजीराजे छत्रपती यांना दिली होती. परंतु संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. तसेच संभाजीराजेंविरोधात राज्यसभेच्या जागेवर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यानंतर आता संभाजीराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास असल्याचे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान महाविकास आघाडी पुरस्कृत खासदार करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. परंतु राज्यसभेची जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करावा यानंतर राजेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येईल अशी शिवसेनेची भूमिका होती. परंतु शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी सोमवारी नाकारली असून त्यांनी कोल्हापूर गाठलं होते. यानंतर त्यांनी कोल्हापूरातुन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे त्याप्रमाणे ते करतील. मला असाही विश्वास आहे की, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजेंनी सांगितले आहे.

शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना सोमवार दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी यावे शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करावा, त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप खासदार संजय राऊत यांच्याकडे दिला होता. परंतु संभाजीराजेंनी या निरोपाकडे पाठ फिरवली आहे. यानंतर त्यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे.

कोल्हापूरचे संजय पवार शिवसेनेकडून उमेदवार?

संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्यामुळे आता दुसरा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली २५ ते ३० वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केले आहे.


हेही वाचा : मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा