‘चित्रपटात इतिहासाची मोडतोड’; संभाजीराजेंचा नेमका विरोध कशाला?

मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट सुद्धा आगामी काळात प्रदर्शित होणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट सुद्धा आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. मात्र, हे दोन चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या इतिहासावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. परंतु, आतापर्यंत बरेच ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात आले असताना संभाजीराजेंनी आताच का चित्रपटांवर आक्षेप घेतला, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. (Sambhaji Raje Chhatrapati Opposition To Marathi Historical Movies Why Read In Marathi)

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची शोर्यगाथा सांगणारे एकूण 8 चित्रपट ‘श्री शिवराज अष्टक’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पहिला चित्रपट ‘फर्जंद’ हा चित्रपट 2018मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. याआधीही बरेच चित्रपट शिवाजी महाराजांवर प्रदर्शित झाले. तर, 2018नंतर एका पाठोपाठ एक असे बरेच ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकाही प्रदर्शित झाल्या. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला संभाजीराजेंनी आत्ताच का विरोध केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार करतोय. त्यामुळे एक हिंदी कलाकार शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय म्हणून संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांवर आक्षेप घेत प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांना इशारा दिला. “इतिहासाचा गाभा धरून राहावा. यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे”, असा इशाराही त्यांनी दिला. पण आतापर्यंत ‘फर्जंद’ (2018), ‘फत्तेशिकस्त’ (2019), ‘पावनखिंड’ (2022) आणि ‘शेर शिवराज’ (2022), ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ असे अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेला इतिहास योग्य होता का, अशीही चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ बोलताना शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता, असे यावेळी संभाजीराजेंनी म्हटले. परंतु, जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत निर्मित झालेल्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटावर संभाजी राजेंनी का नाही आक्षेप घेतला. त्यावेळीही बऱ्याच जणांनी या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याची मते मांडली होती. का यामागे काही राजकारण दडलंय, अशीही चर्चा आहे.

संभाजीराजेंचा मनसे विरोध?

कारण संभाजीराजे यांनी आक्षेप घेतलेल्या ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मनसेचा सहभाग आहे. कारण ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या ट्रेलरला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील अक्षयच्या भूमिकेला राज ठाकरेंचा पाठिंबा होता. अक्षय कुमारनेही मला राज ठाकरेंमुळे शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली स्पष्ट केले होते. त्यामुळे संभाजीराजे यांचा या दोन चित्रपटात घेण्यात आक्षेप हा हिंदी कलाकार अक्षय कुमारवर आहे, की मनसेच्या असलेल्या सहभागावर आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा – ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला, पिंपरीत संभाजी ब्रिगेड आक्रमक