…मग शिवस्मारकाच्या प्रश्नाकडे कोण बघणार? संभाजीराजेंचा पंतप्रधानांना सवाल

Sambhaji Raje Chhatrapat

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी मुंबईच्या विकासाबाबत भाष्य केले. तसेच मुंबईतील अनेक विकास कामांचं त्यांनी उद्घाटन केलं. मोदींनी आपल्या भाषणातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजवत महाविकास आघाडीवर टीका केली. दरम्यान, शिवस्मारकाच्या प्रश्नाकडे कोण बघणार?, असा प्रश्न माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या राज्यात समुद्री किनाऱ्यावर सर्वाधिक किल्ले आहेत. त्याबाबतचा प्लॅन माझ्याकडे आहे. त्यावर मी बोलून थकलो असून त्याची कोणीही दखल घेत नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आला आहात ना, तर राज्यातील गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे नरेंद्र मोदींनी लक्ष द्यावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

मी काल रायगडावर होतो. त्यामुळे नरेंद्र मोदी काय म्हणाले याबद्दल मला माहिती नाही. मी किल्ल्यावर असल्याने मला दुसरे काही सुचत नव्हते. रायगड किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल, त्यामध्ये मी मग्न होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जलपूजन कार्यक्रमास गेलो होतो. पण आता त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक?

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ओरिजिनल उपाध्या वेगळ्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असल्याचे आजवर मी केलेल्या ऐतिहासिक भाषणात सांगत आलो आहे. त्यावेळी कोणाला लक्षात आलं नाही. पण आता धर्मवीर शब्दावरून राजकीय पक्षात राजकारण सुरू झालं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.


हेही वाचा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच? निवडणूक आयोगासमोर कपिल सिब्बलांचा युक्तीवाद