इगतपुरी : आमचे शाहू महाराज मागासवर्गीयांना पुढे घेऊन जाण्यासाठी लढत होते. त्याच गादीवर तुम्ही आहात तुम्ही एका समाजाची भूमिका का घेऊन बोलता, असा सवाल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीराजे छत्रपती यांना केला आहे. छगन भुजबळ यांच्या हस्ते आज मोडाळे ता.इगतपुरी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका आहे, पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला हवे ही मागणी आहे. कारण जबरदस्तीने कोणाला ओबीसीमध्ये घुसवले तर परत कोर्ट कचेऱ्या होतील आणि हा प्रश्न तसाच पडून राहील, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
संभाजीराजे छत्रपतींवर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, छगन भुजबळ हे दोन जातीत वितुष्ट निर्माण करता आहे त्यांना मंत्रिपदावरून काढा. मला त्यांना सांगायचं आहे की, आमचे शाहू महाराज मागासवर्गीयांना पुढे घेऊन जाण्यासाठी लढत होते. त्याच गादीवर तुम्ही आहात तुम्ही एका समाजाची भूमिका का घेऊन बोलता. महाराज हे सर्व समाजाचे आहे. तुम्ही सांगायला हवे होत सगळ्यांचे आरक्षण शाबूत ठेवा. जेव्हा बीड मध्ये जाळपोळ झाली तेथे जाऊन त्यांचे अश्रू पुसायल हवे होते, हे पण तुमचे काम होत. वेगवेगळे समाज पक्ष यांच्या कडून माझी हीच अपेक्षा की आमचे पण म्हणणे ऐकून घ्या”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘गावबंदीचे बोर्ड तत्काळ काढा’; भुजबळांचा पुर्नरुच्चार, फडणवीसांना केलं आवाहन
मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला हवे
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका आहे, पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला हवे ही मागणी आहे. कारण जबरदस्तीने कोणाला ओबीसीमध्ये घुसवले तर परत कोर्ट कचेऱ्या होतील आणि हा प्रश्न तसाच पडून राहील. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समाजात जे दबलेले पिचलेले आहेत जे मागास आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आहे. आजही एससी, एसटी प्रवर्गाला आरक्षण देऊन इतके वर्ष झाले तरी देखील आजही मोठा समाज गरिबीच्या छायेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसीला सहज आरक्षण मिळालेले नाही
छगन भुजबळ पुढे म्हणाले, “ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे सहजासहजी मिळालेले आरक्षण नाही. यासाठी अनेक वर्ष लागली अनेक आयोग झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीच्या खंडपीठाने हे आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय दिला. आज ओबीसी समाजात पावणे चारशे जाती झाल्या आहे. त्यात ओबीसीत समावेश होण्यासाठी काही लोक अडून बसले, जाळपोळ झाली मग आम्ही कसे शांत बसणार”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.