घरमहाराष्ट्रआंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळेल

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळेल

Subscribe

संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यानंतर मराठा समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु, पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणे सुरू केले आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक चिघळू शकते, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दिला आहे.

संभाजीराजेंनी या पत्रात म्हटले आहे की, नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करून आणि नोटीस बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतःसाठीच उभारण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे. तसेच न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्याउपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे, असा इशारा देत त्यामुळे आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली आहे.
छत्रपती उदयनराजेंनी आंदोलनाचे नेतृत्व करावे

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले आहे.

- Advertisement -

उदयनराजेंनी नेतृत्त्व करावे

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. मात्र, याकडेही राजकारणाच्या दृष्टीकोनातून बघणार्‍या राजकीय नेत्यांनी त्यातून मराठा समाजात दुफळी माजेल, असा प्रयत्न सुरू केला का, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्त्व उदयनराजे भोसले यांनी करावे, अशी त्यांना विनंती केली असताना शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी नेतृत्व स्वीकारण्याची गळ घातली आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या अनेक संघटना, पक्ष आपापल्या परीने संघर्ष करत आहेत. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोबत घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील सर्वच समाज घटक त्यांच्या नेतृत्वात काम करतील. त्यामुळे उदयन महाराजांनी धुरा सांभाळावी असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मात्र विनायक मेटेंच्या मागणीला छेद देत मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी करावे, अशी मागणी केली आहे. राहुल शेवाळे यांनी नुकतीच संभाजीराजे दिल्लीत सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी निवेदन देताना त्यांनी ही मागणी केली. तसेच या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. या लढ्यात सुरुवातीपासूनच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -