घरमहाराष्ट्रसंभाजीराजेंकडे सूचक म्हणून 10 आमदारही नाहीत, उमेदवारी मागे घेणार? शुक्रवारी पत्रकार परिषद

संभाजीराजेंकडे सूचक म्हणून 10 आमदारही नाहीत, उमेदवारी मागे घेणार? शुक्रवारी पत्रकार परिषद

Subscribe

राज ठाकरे यांच्या मनसेकडे राजू पाटलांच्या रूपात एक आमदार आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक आमदार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेचं संख्याबळही 1 आमदारानं कमी झालंय.

मुंबईः शिवसेनेची उमेदवारी संभाजीराजेंनी नाकारल्यानंतर आता ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर संजय राऊतांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे, पण संभाजीराजेंनी उमेदवारी अर्ज अद्याप भरलेला नसल्यानं त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावरच आता शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार असल्याच्या घोषणा करणाऱ्या संभाजीराजेंच्या पाठीमागे अनुमोदन द्यायला 10 आमदारही नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावू शकते.

लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेचं संख्याबळही 1 आमदारानं कमी

यंदा विधानसभेत 13 अपक्ष आमदारांचं संख्याबळ आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’कडे 3 आमदार आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांच्याकडे प्रत्येकी दोन आमदारांचं संख्याबळ आहे. राज ठाकरे यांच्या मनसेकडे राजू पाटलांच्या रूपात एक आमदार आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक आमदार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेचं संख्याबळही 1 आमदारानं कमी झालंय. सध्याच्या विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजप 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, बहुजन विकास आघाडी 03, प्रहार जनशक्ती 02, एमआयएम 02, समाजवादी पक्ष 02, मनसे 01, माकप 01, जनसुराज्य शक्ती 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 01, शेकाप 01, रासप 01, स्वाभिमानी 01, अपक्ष 13 आमदार आहे. परंतु अपक्ष 13 सोडाच इतर बहुजन विकास आघाडीसारखे छोटे पक्षही संभाजीराजेंच्या बाजूनं नाहीत. त्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी त्यांच्याकडे 10 आमदारही नसल्याचं सांगितलं जातंय. म्हणूनच संभाजीराजे उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

तरी संभाजीराजे निवडून येणं मुश्कील

महाराष्ट्रातूनही राज्यसभेच्या 6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. राज्यसभेसाठी 31 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार भाजपला 2, शिवसेनेला 1, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 1 अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज असते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त असली तरी भाजपकडे 22 मतं शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्येनुसार जर संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर संभाजीराजे निवडून येऊ शकतील, पण ते कठीणच वाटतंय. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यात मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे, काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल आणि अंबिका सोनी, बसपचे सतीश चंद्र मिश्रा, पी चिदंबरम (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राकांपा) आणि संजय राऊत (शिवसेना) यांचा समावेश आहे.

संभाजीराजे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार होतील ही शिवसेनेला आशा

दुसरीकडे राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला असला तरी त्याला दबावाचा एक भाग समजलं जातंय. म्हणून अजूनही संभाजीराजे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार होतील ही शिवसेनेला आशा आहे. संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी दिली जावी, यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास राज्यसभेची उमेदवारी मागे घेऊन महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेची पाळेमुळे रुजवण्याचे ते प्रयत्न करू शकतात. पण त्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. तुम्हाला आमची मते हवीत, पण पक्ष नको, असं चालणार नसल्याचं सांगत शिवसेनेही हा विषय संपवलाय. एकदा निर्णय घेतला तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहसा बदलत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने उमेदवारीचा विषय संपल्यात जमा असल्याचं बोललं जातंय.

- Advertisement -

संभाजीराजेंना अद्याप कोणत्याच पक्षाने पाठिंबा दिलेला नाही

खरं तर संभाजीराजेंना अद्याप कोणत्याच पक्षाने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागू शकते. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पण कुठल्या पक्षाचा पाठिंबा नसल्यानं संभाजीराजे हे दहा आमदार कुठून आणणार हा प्रश्नच आहे. सध्या महाविकास आघाडीच्या जवळ आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत. पण संभाजीराजेंना अद्यापही कुठल्या आमदाराने पाठिंबा दिलेला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेनं मुद्दामहून शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुखाच्या रूपात संजय पवारांना उमेदवारी दिलीय, जेणेकरून कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार राहील. त्यामुळे हा संभाजीराजेंवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचंही बोललं जातंय. एक तर शिवसेनेचा पर्याय स्वीकारा किंवा राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्या, सध्या हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत.

पवार यातून काही तोडगा काढतील का?

विशेष म्हणजे राजकारणातले चाणक्य आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील का, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत; परंतु शरद पवारही एका मर्यादेपलीकडे प्रयत्न करू शकत नाहीत. कारण राज्यसभेची ही जागा राष्ट्रवादीची नव्हे, तर शिवसेनेची आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शरद पवार आणि फौजिया खान यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही. दुसरीकडे भाजपही सध्या त्यांना राज्यसभेवर निवडून आणू शकत नाही. तसेच इतर कोणाची खासदारकी काढून त्यांना खासदारही करणार नाही. त्यामुळे संभाजीराजे कोणता मार्ग स्वीकारतात हे त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरवणारं आहे.


हेही वाचाः Rajya Sabha Polls: राज्यसभा निवडणुकीसाठी 15 राज्यांतील 57 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज, यूपीच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -