घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा गोंधळ - खासदार छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा गोंधळ – खासदार छत्रपती संभाजीराजे

Subscribe

छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले

राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अजूनही गंभीर नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जाताना दिसतोय. मराठा समाजाच्या आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळतंय. दरम्यान, शुक्रवारी पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेली भूमिका वेळोवेळी बदलत आलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा गोंधळ सुरूच असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले यासह मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे कोणताही अॅक्शन प्लान का नाही? असा सवाल पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत उपस्थितीत केला.

छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोर्टात जी भूमिका घेतली आहे त्यावरून असे दिसून येते की सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता. अधिकारी आणि मंत्री यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत दिसून आली. सुनावणीला वकिल हजर नसल्याने सरकार या प्रकरणाबाबत गंभीर नाही हे दिसून आले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरक्षणावर स्थगिती दिल्यावर सरकारने आपली भूमिका वेळोवेळी बदलली. सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत ‘अ‍ॅक्शन प्लॅन का नाही?” असा प्रश्नही संभाजीराजे यांनी उपस्थितीत केला.

- Advertisement -

“कोणत्याही राज्याला ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असा नवा नियम सांगतो. पण काही राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्या राज्यांच्या भूमिका आपण ऐकून घेतल्या पाहिजेत असे महाराष्ट्र सरकारला राज्यातील कायदेपंडितांनी सूचवले होते. त्यानंतर आता आठवडा गेला पण अद्याप यावर काहीही सकारात्मक हलचाल दिसत नाही. सहानी अहवालात नमूद करण्यात आलं आहे की अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या राज्यात ५० टक्क्याहून अधिक आरक्षण देणं शक्य आहे. तर मग राज्य सरकारला ही परिस्थिती अपवादात्मक आहे हे सिद्ध का करता येत नाही?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मराठा आंदोलकांना संयमी राहण्याचं आवाहन

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६७ पर्यंत देशाच्या संसेदेने आरक्षणासाठी तीन वर्ग तयार केले होते. ST, SC आणि OBC असे हे तीन वर्ग होते. त्यातील OBC वर्गात मराठा समाजाचा समावेश होता. पण १९६८ मराठा समाजाला त्या वर्गातून मुक्त करण्यात आले. तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतचा प्रवास सुरू झाला आहे. मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की मी केवळ या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन येथे आलोय असे नाही. २००७ पासून मी आरक्षणाचा विषय लावून धरला आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका नेहमी मांडली आहे. २०१३ साली माझ्या नेतृत्वाखाली आम्ही मराठा समाजासाठी एक आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी नारायण राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले पण ते वैधानिक पातळीवर टिकू शकले नाही. त्यानंतर २०१७ लादेखील आंदोलन झालं. त्यात मी मराठा आंदोलकांना शांत व संयमी राहण्याचं आवाहन केले. कारण आंदोलनाचा गालबोट लागल्यास त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो”, असेही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -