संभाजीराजे समर्थकांचा व्हिडीओ व्हायरल

Dispute between two teams in football tournament in Kolhapur
संभाजीराजे समर्थकांचा व्हिडीओ व्हायरल

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले होते. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्याचे आवाहन केले होते. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेने संभाजीराजेंना पक्षात प्रवेश करुन पक्षाच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी म्हणून लढण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे तोडगा निघू शकलेला नाही. यावर संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यापूर्वी आज समर्थकांकडून संभाजीराजेंचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओत राजकीय पक्षांना इशारा देण्यात आला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे रायगडावरील फोटो आहेत. त्या फोटोसह या व्हिडीओत एक डायलॉग ऐकायला मिळत आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्या आधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो, हा डायलॉग नेमका कुणाला इशारा आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेणार –

संभाजीराजे छत्रपती उद्या (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.