संभाजीनगर दंगलीप्रकरणी फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, चिथवणारी वक्तव्ये…

devendra fadnavis
संग्रहित छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात तुफान राडा. येथील सामाजित वातावरण बिघडले होते. परंतु, आता येथे शांतता प्रस्थापित झाली आहे. संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु, येथील परिस्थिती चिघळली पाहिजे याकरता काही नेत्यांकडून भडकवणारी स्टेटमेंट येत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी संभाजीनगर दंगलीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, येथील परिस्थिती चिघळावी याकरता काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे की भडकवणारे स्टेटमेंट येत आहेत. अशा परिस्थिती नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कोणीही अशाप्रकारचे स्टेटमेंट देत असेल तर देऊ नये. सर्वांनी शांतता पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्व नेत्यांची आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असेल तर यापेक्षा काहीही दुर्दैवं नाही. अशाप्रकारचं स्टेटमेंट देणं यातून किती राजकीय बुद्धीने आणि छोट्या बुद्धीने बोललं जातंय याचं परिचायक आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं काय घडलं?

शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना रात्री ११.३० ते १२ वाजता दरम्यान घडली. आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Dr.Nikhil Gupta) यांनी सांगितले आहे.

यांना न्यायालयीन प्रक्रिया समजत नाही

महाराष्ट्र सरकार नपुसंक असल्याची टीका सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर विरोधकांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलं. परंतु, यावरून देवेंद्र फडणवीस यांनीच विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असं कोणतंही निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने केलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली हे दाखवल्यानंतर अद्यापही महाराष्ट्र सरकारविरोधात कन्टेम्प्ट सुरू केलेला नाही. यासंदर्भात कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही. सॉलिसिटर जनरल साहेबांनी इतर राज्यांत काय काय होतंय आणि कसं महाराष्ट्रालाच पिनपाइंट केलं जातंय हे दाखवून दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक जरनल स्टेटमेंट सर्वांसदर्भात केलं की राज्य सरकारांनी यासंदर्भात कारवाई केली पाहिजे. न्यायालयाने राज्य सरकारविरोधात निर्णय दिलेला नाही. कन्टेम्प्ट सुरू केलेला नाही. जाणीवपूर्वक कोणतंही वाक्य काढायचं आहे, आणि विरोध करायचा. याचा अर्थ त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजत नाही असंच वाटतंय. त्यामुळे त्यांच्यावर काहीही बोलण्यात अर्थ नाही, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही, सरकार नपुंसक; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले