…तर उठाव होणारच, राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsing Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून ते सध्या निशण्यावर आहेत. त्यांनी माफी मागावी आणि त्यांना पदावरून पायउतार करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येतेय. अशातच, राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यांनी याआधी पत्र लिहून राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.


राज्यपाल केश्यारी नेमकं काय म्हणाले?

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, तुम्हाला कुणी विचारले की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.

दरम्यान याआधी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या विरुद्ध सुद्धा बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरूनही मोठया प्रमाणात वादंग झाला होता अशातच राज्यपालांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फुटले आहे.