Sameer Wankhede : वानखेडे प्रकरणात भाजपा पूर्ण बुडालाय, ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरण सरळसाधे नाही. या प्रकरणात भाजपा (BJP) पूर्ण बुडाला आहे. वानखेडे प्रकरणात भाजपाच्या अनेक नेत्यांचे हात बरबटले आहेत आणि त्यांचीदेखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणीखोरी, दहशत वगैरेंचे आरोप पुराव्यांसह केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन यास ‘कॉर्डिलिया’ क्रूझ प्रकरणात ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला याच पद्धतीने अडकवले होते. अनेक निरपराध्यांचे बळी अशा प्रकारे घेतले. वानखेडेंचा दरबार व कारभार आता उघडा पडला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ भाजपाचे मुंबईतील अतुल भातखळकर यांच्यासारखे अनेक उठवळ आमदार त्यावेळी रस्त्यावर उतरून नवाब मलिक यांच्याविरोधात बोंबा मारीत होते. खार येथील एका टिनपाट भाजपा नेत्याच्या घरी वानखेडे व त्यांच्या टोळीच्या बैठका चालत व तेथे देण्याघेण्याचे व्यवहार होत. अनेकदा वरिष्ठ भाजपा नेते त्या ठिकाणी चहापाण्यासाठी ये-जा करीत असे सांगितले जाते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकविण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर केला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे, मनसुख हिरेनची हत्या करणे अशा कटांत ज्यांचा थेट सहभाग होता, त्या परमबीर सिंग यांना मिंधे-फडणवीस यांच्या सरकारने आता पुन्हा सेवेत घेतले. राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात पाठवले याचे बक्षीसच परमबीर यांना सध्याच्या सरकारने दिले. उद्या हे सरकार व केंद्रीय यंत्रणा वाझे, प्रदीप शर्मा यांनाही ‘क्लीन चिट’ देतील. या सरकारचा काहीच भरवसा नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खरे ठरले. मलिक यांनी इतरही काही स्फोटक माहिती समोर आणली व त्यामुळेच त्यांच्याविरोधात कारस्थान रचून त्यांना आत टाकले गेले. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी हे सर्व बिनबोभाट चालले आहे, असा दावा करतानाच ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री दादा भुसे यांनी ‘गिरणा मोसम सहकारी कारखाना बचाव’च्या नावाखाली दीडशे कोटींच्या आसपास रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली. त्या पैशांचे पुढे काय झाले? मोठा घोटाळा त्यात आहे. तपास यंत्रणा त्यावर गप्प आहेत. भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्याची लूटमार करून 500 कोटींचा अपहार केला. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र फडणवीस व तपास यंत्रणा त्यासंदर्भात गप्प आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

किरीट सोमय्यांचा आयएनएस विक्रांत घोटाळा, प्रवीण दरेकर यांचा मुंबई बँक कर्ज घोटाळा, भाजपाच्या लाडांपासून कंबोजपर्यंत सगळ्या घोटाळेबाजांना 24 तासांत ‘क्लीन चिट’ देऊन विरोधकांना मात्र खोट्या प्रकरणात चौकशांच्या फेऱ्यात अडकवले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या घरगड्यांसारख्या वागत आहेत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.