समृद्धी महामार्ग की अपघातांचा मार्ग; 100 दिवसांत 31 जणांनी गमावला जीव

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रशंसा करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाला आज सुरु होऊन 100 दिवस झाले आहेत. पण या 100 दिवसांत 900 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या गाजावाजा करत सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग हा अपघाताचा महामार्ग बनला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Samruddhi Mahamarg or Path of Accidents; 31 people lost their lives in 100 days
default

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग सुरु होऊन आज (ता. २१ मार्च) १०० दिवस पूर्ण झाले आहेत. पण या 100 दिवसांत या महामार्गावर छोटे-मोठे असे 900 अपघात झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकांच्या सोयींसाठी बनविण्यात आलेला हा समृद्धी महामार्ग लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे का? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. तसेच या महामार्गावर लोकांनाच नाही तर वन्यप्राण्यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर या 100 दिवसात महामार्गावर छोटे मोठे असे 900 अपघात झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या मार्गावरील 46 टक्के अपघात हे मेकॅनिक ब्रेक डाऊन झाल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे आणि 12 टक्के अपघात हे टायर फुटल्याने झाले आहेत. दुखःद बाब म्हणजे काही अपघातांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावरबाबत निर्णय घेण्याची गरज आहे, असे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

तसेच, समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना त्यांची दुचाकी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. या मार्गावर परवानगी देण्यात आलेल्या मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असताना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे देखील हे अपघात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्यावर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटन केले होते. त्यानंतर हा रस्ता प्रवास करण्यासाठी खुला करून देण्यात आला होता. पण या महामार्गावरील अपघातांची मालिका पाहता, परिवहन विभागाकडून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये वेगाचे उल्लंघन करणारे, लेन शिस्त न पळणारे यांच्यासाठी तसेच टायरबाबत माहिती देण्यासाठी वाहन चालकांसाठी 8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रस्ता सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावणे, सर्व टोल नाक्यांवर PA system सुरू करणे करणे आणि ट्रक चालकांसाठी विश्रांतीसाठी व्यवस्था निर्माण करणे, यांसारख्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.


हेही वाचा – घर खरेदीसाठी साधता येणार गुढीपाडव्याचा मुर्हूत, दस्त नोंदणी कार्यालय राहणार खुले