Sandeep Deshpande At Shivteerth: जामीन मिळताच संदीप देशपांडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना काल गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या दोघांनीही अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी मशिदीसमोर भोंगा लावणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरूवात केली होती. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशपांडे आणि धुरी यांनी पलायन करत गाडीतून फरार झाले होते. परंतु या धक्काबुक्कीत एक महिला पोलीस खाली पडली आणि जखमी झाली होती. त्यानंतर शिवाजी पार्क येथील पोलिसांनी या प्रकरणी देशपांडे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कलम ३५३, २७९ आणि ३३६ अनव्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, देशपांडे आणि धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले. त्यानंतर या दोघांनीही आज राज ठाकरेंची भेट घेतली. परंतु कशासंदर्भात चर्चा झाली हे अद्यापही समोर आलेलं नाहीये.


हेही वाचा : Pre Monsoon Rain : राज्यातील काही भागात मान्सून दाखल, बळीराजाला मोठा फटका