ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुन्ह्याची कबुली, हल्ल्यामागचं कारणही सांगितलं!

sandeep deshpande1

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज भांडुपच्या कोकण नगरमधून दोघांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एकजण शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, त्याने संदीप देशपांडे यांच्यावर केलेल्या हल्ल्याची कबुली दिली असून कारणही सांगितलं आहे. (Sandeep Deshpande Attack Case)

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले असून तपासासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी दोघांना भांडुपच्या कोकण नगर परिसरातून ताब्यात घेतलं आहे. अशोक खरात असं एका संशयित आरोपीचं नाव असून तो शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामागार सेनेचा उपाध्यक्ष आहे. तर, दुसरा संशयित आरोपी सोलंकी नामक व्यक्ती असून त्याने नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा – पालिकेतील फर्निचर घोटाळा बाहेर येणार होता म्हणून…, संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सतत टिका केल्यामुळे हल्ला केला असल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या हल्ल्यामागे ठाकरे गटातील नेत्यांचा हात असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या जबाबातही वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यातच, आरोपींना ज्या विभागातून पकडण्यात आलं आहे, तिथेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राहतात. त्यामुळे या हल्ल्याच्या संशयाची सुई ठाकरे गटाकडेच जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.


कोण आहे अशोक खरात?

शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला अशोक खरात याची आधीपासूनच गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अशोक खरात गेल्या काही महिन्यांपासून शांत होता. परंतु, संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्यावर चौकशीचा फेरा लागला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाले आरोपी

संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे या फुटेजच्या आधारावर पोलिसांच्या आठ पथकाने तपास केला. तपासाअंती हे संशयित आरोपी पोलिसांना भांडूपच्या कोकण नगर परिसरात त्यांच्या राहत्या घरात सापडले.