Sandeep Deshpande : मनसेकडून द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा मोफत शो, तिकिटासाठी संपर्क करण्याचे आवाहन

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी टॅक्स फ्री करा, अशा प्रकारची मागणी संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात होत होती. असे असतानाच या चित्रपटाचे अनेक ठिकाणी मोफत शो आयोजित केले जात आहेत. त्यामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा फोटो संदीप देशपांडेंनी पोस्ट केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. तसेच तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पत्ता दिला असून त्यावर संपर्क करण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय. २४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता माहिममधील एल.जे.रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे, अशा प्रकारची माहिती फोटोच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

मनसेतर्फे दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या शोची मोफत तिकीटं दादरमधील हेदक्करवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये उपलब्ध असतील, असं संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान, द काश्मीर फाईल्स हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्याने याआधी मिशन मंगल, तानाजी, पानिपत असे सिनेमे करमुक्त करण्यात आले होते.


हेही वाचा : कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पगाराच्या मुद्द्यावर विधान परिषदेत गोंधळ