Homeमहाराष्ट्रSandeep Kshirsagar : दमानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप; संदीप क्षीरसागर म्हणाले, मी पहिल्यापासून...

Sandeep Kshirsagar : दमानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप; संदीप क्षीरसागर म्हणाले, मी पहिल्यापासून…

Subscribe

बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडेंनी कृषीमंत्री असताना शेतीसंबंधित वस्तू खरेदीत घोटाळा केला आहे, असा आरोप करत दमानियांनी थेट पुरावेच सादर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अंजली दमानिया यांनी आरोप केले असतील, तर ते कागदपत्रांशिवाय बोलत नाहीत, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहेत. ते बीड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संदीप क्षीरसागर म्हणाले, “अंजली दमानियांनी आरोप केले असतील, तर ते कागदपत्रांशिवाय बोलत नाहीत. हार्वेस्टर प्रकरणात ज्यांना त्रास झाला, ती लोक संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बोलत आहेत. कुणा-कुणावर अन्याय झाला, ती लोक मला भेटून कागदपत्रे देत आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, हे मी पहिल्यापासून बोलत आहे. खंडणीमुळे संतोष देशमुखांयी हत्या झाली आहे.”

हेही वाचा : दमानियांनी फोडला मोठा बॉम्ब! धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, थेट पुरावेच मांडले

“संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपींवर उशिरा गुन्हा दाखल झाला. वाल्मिक कराड एवढा मोठा नाही की, त्याच्या दबावामुळे उशिरा गुन्हा दाखल झाला होता. कुणीतरी वरदहस्त माणसाने पोलीस प्रशासनाला फोन केला होता. याचे सीडीआर तपासले तर नक्कीच सगळे समोर येईल. 28 तारखेला बीडमध्ये आपला मोर्चा झाला, तेव्हा वाल्मिक कराड एका मोठ्या रूग्णालयातून हा मोर्चा पाहत होता. तेव्हा, वाल्मिक कराडला कोण भेटले, त्याला संरक्षण कुणी दिले?” असे प्रश्न क्षीरसागर यांनी उपस्थित केले.

“धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे असल्याचे सांगितले. एक मंत्री म्हणून वाल्मिक कराडला संरक्षण भेटत आहे. कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. फरार आरोपीला अटक का झाली नाही? ते सापडतील असे वाटत नाही,” असा दावाही क्षीरसागर यांनी केला आहे.

दमानियांनी काय केले आरोप?

“तत्कालीन कृषीमंत्र्यांनी कायदा पायदळी तुडवून शेतकऱ्यांचे पैसे किती खालले, कसे खालले, याचे मी पुरावे देणार आहे. नॅनो युरिया, नॅनो डिएपी आणि बॅटरीचे फवारणी यंत्र, मेटाल्ट डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी बॅगा खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहेत. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली 92 रूपयांना मिळणारी ‘नॅनो युरियाची’ बाटली 220 रूपयांना विकत घेतली. 269 रूपयांना मिळणारी ‘नॅनो डीएपी’ची बाटली 590 रूपयांना खरेदी केली आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा या दोन्ही वस्तूंचा घोटाळा फक्त 88 कोटींचा आहे,” असं अंजली दमानिया यांनी म्हटले.

हेही वाचा : ‘शिवराय लाच देऊन आग्र्याहून सुटले होते,’ मराठी अभिनेतेच्या विधानावर छगन भुजबळ संतापले; म्हणाले…