Homeमहाराष्ट्रSandeep Kshirsagar : धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्यच, संदीप क्षीरसागरांनी सांगितले कारण

Sandeep Kshirsagar : धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्यच, संदीप क्षीरसागरांनी सांगितले कारण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी म्हणून वाल्मीक कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी सुद्धा सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागमी सत्ताधारी आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विरोधातील नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. परंतु, कोणी कितीही पुरावे दिले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर अजित पवारांकडूनही अपेक्षा ठेवू नका, तेही राजीनामा घेत नसतात, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Sandeep Kshirsagar said that Dhananjay Munde resignation is impossible)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “वाल्मीक कराड जसा धनंजय मुंडे यांचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे, भले कितीह पुरावे दिले तरी” ही पोस्ट क्षीरसागर यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केली आहे. तर त्यांनी त्याचवेळी आणखी एक पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. पवारांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अजित पवारांकडून अपेक्षा ठेवू नका, राजीनामा होत नसतो आणि वाल्मीक कराड सहा महिन्यांनी निर्दोष सुटेल, कारण सगळे एकाच माळेचे मणी आहेत. महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा अटक केले जाणार नाहीत. न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन पुर्णपणे बरबटलेले आहे. सामान्य माणसाला कधीच न्याय मिळणार नाही. सत्ता आणि पैशासमोर सामान्यांना झुकावेच लागते. मोर्चे बिर्चे काढूनही काही उपयोग होणार नाही. असेच जर सुरू राहिले तर परिस्थितीला कंटाळून ईराण, सिरीयासारखी परिस्थिती झाली तर नवल वाटायला नको. या प्रकरणाचा आदर्श घेऊन उद्या राज्यात जर जातीजातीत गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या तर राज्य गृहयुद्धाच्या दिशेने जाऊ शकते.” असे क्षीरसागर यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. ही पोस्ट सुद्धा क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केली आहे.

हेही वाचा… Sharad Pawar : ‘मी तुतारीवाला नुसता नावाला, खरा तर मी…’, शरद पवारांच्या आमदाराकडून पक्ष बदलाचे संकेत?

आमदार क्षीरसागर यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटून त्यांना वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबंधाचे पुरावे दिले होते. त्यानंतर अजित पवारांना दमानिया यांना इतर गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.