संगमनेरच्या कळमजाई धबधब्याची पर्यटकांना भुरळ

संगमनेर : निसर्गाच्या कुशीत चारीही बाजूंनी डोंगर आणि दुधासारखा शुभ्र धबधबा, त्यात हिरवा शालू पांघरलेला डोंगर हे सर्व मनमोहक दृश्य संगमनेर तालुक्यातील घारगावपासून काही अंतरावरच असलेल्या निसर्गाच्या कुशीतील कळमजाई देवीचा धबधबा येथे पर्यटकांना पाहायला मिळत आहे. हा धबधबा उंचावरून कोसळणार्‍या पांढर्‍या शुभ्र धारा पर्यटकांना खुणावू लागल्या आहेत.

घारगावपासून काही अंतरावरच व निसर्गाच्या कुशीत कळमजाई देवीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर डोंगरात आहे. जवळूनच मोठा प्रसिद्ध धबधबा वाहत आहे. चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सध्या हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला पाहावयास मिळत आहे. कळमजाई देवीचे मंदिर असल्याने अनेक भाविकही याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अधूनमधून मोरांचाही मंजूळ आवाज कानी पडत आहे. कळमजाई देवीचा धबधबा हा प्रसिद्ध असल्याने ठिकठिकाणाहून पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत असतात. दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस झाल्याने डोंगरावरचे पाणी खाली वाहत येत आहे. त्यामुळे हा धबधबा वाहू लागला आहे. संपूर्ण परिसर हा पर्यटकांना आकर्षित करत आहे. या धबधब्याच्या उंचावरून दुधासारखे शुभ्र पाणी कोसळत आहे. त्यामुळे कळमजाई देवीचा धबधबा आता पर्यटकांना खुणावू लागला आहे. या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी वनविभागाने दोन मनोरेही बांधले आहेत. कळमजाई देवीचा धबधबा वाहता झाल्याचे समजताच अनेक पर्यटकांनी पाऊल धबधब्याकडे येऊ लागली आहेत.