संघाची फौज कोरोना युध्दात, भाजपचे नेते राजकारणात

राज्यातील भाजपचे नेते राजकारण करत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कोरोनाच्या युध्दात शिस्तीने रस्त्यावर मदतीसाठी उतरले आहेत. 

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, भाजप नेत्यांकडून कोरोना संकटात देखील आरोप आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पडकण्याची संधीच भाजपचे नेते शोधत आहेत. मात्र एकीकडे राज्यातील भाजपचे नेते राजकारण करत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कोरोनाच्या युध्दात शिस्तीने रस्त्यावर मदतीसाठी उतरले आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य व पुनर्वसनाच्या कामासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अत्यंत समर्पित भावनेने काम करतात. देशावर कोरोनाचे संकट येताच संघाचे कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाकडील आकडेवारीनुसार २ मेपर्यंत संघाचे ३ लाख ४२ हजार ३१९ स्वयंसेवक कोरोनाच्या युध्दात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर हा आकडा अधिक वाढला. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये मदत करण्यापासून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप, जेवणाच्या पाकिटांचे वाटप, मास्क वाटप, बेघरांसाठी निवारा, स्थलांतरीत मजुरांना मदत रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक काढा वाटप असे स्वयंसेवकांचे अविरत काम सुरु आहे.

भाजपचे पन्नाप्रमुख गायब

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांचे जीवावर उदार होऊन काम सुरु आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे नेते राजकारणात मश्गुल आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राजकारण करण्यापेक्षा या कठीण काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून मदत करण्याची गरज असल्याचे स्वयंसेवकांचे स्पष्ट मत आहे. पण सध्या भाजपचे कार्यकर्ते गायब असल्याची स्वयंसेवकांची सार्वत्रिक तक्रार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने पन्नाप्रमुखाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती. पण या काळात पन्नाप्रमुख, गटप्रमुख घरातून खाली उतरत नाही. मात्र दुसरीकडे स्वयंसेवक संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज रस्त्यावर उतरली आहे.

प्रसिध्दीविना काम सुरु

स्वयंसेवकांचे सध्या कोणत्याही प्रसिध्दी शिवाय काम सुरु आहे. स्थानिक महापालिका, स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे स्वयंसेवक थेट रेडझोन- कंटेनमेंट झोनमधील वस्त्यांमध्ये शिरून कोरोना चाचण्यांसाठी मदत करीत आहेत. पण या कामाची आम्ही कोणतीही प्रसिध्दी करीत नाही असे एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने खंत व्यक्त केली.