सांगली : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशामध्ये आता सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विट्याजवळील कार्वे येथे मारहाण केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर तलवार, गुप्ती, हॉकी स्टिकने हल्ला केल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक विपुल पाटील यांनी सांगितले आहे. गुरुवारी (16 जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली असून संबधित तरुण हा कार्वे गावातीलच असल्याचे सांगण्यात आले आहे. (Sangli Crime Young man killed three arrested)
हेही वाचा : Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय! लोखंडी रॉड अन् धारदार शस्त्रानं दोन भावांची हत्या, तिसरा भाऊ…
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या कार्वे गावामध्ये ही घटना घडली आहे. 35 वर्षीय पहिलवान असलेल्या राहुल गणपती जाधव याची काही अज्ञातांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर काही जणांनी पहिलवान राहुल जाधवला गाठले. त्यानंतर गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने त्याच्यावर वार केलेले. एवढेच नव्हे तर त्यांनी राहुल जाधववर हॉकी स्टिकने मारहाणदेखील करत निर्घूण हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे.
संबधित हत्ये प्रकरणात विटा पोलीस ठाण्यात राजाराम जाधव यांनी सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार राहुल जाधव हे गुरुवारी रात्री चारचाकीमधून जात असताना कार्वे गावच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या पुलावर त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य चार जणांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक विपुल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणजिराज ढाब्याचे चालक माणिक परीट आणि राहुल जाधव या दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी राहुल जाधवने त्यांना मारहाण केली होती. या रागातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.