Coronavirus : सामाजिक बांधिलकी म्हणून कमी आणि सवलतीच्या दरात सॅनिटायजर्सचे उत्पादन होणार!

आता सॅनिटायजर्ससाठी परवानगी मिळाल्याने अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायजर्सची निर्मिती सुरू झाली आहे.

किरण कारंडे

कोरोनाच्या संकटात राज्यातील साखर कारखान्यांच्या ४९ डिस्टीलरीजच्या ठिकाणी सॅनिटायजर्स बनवण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या सर्व डिस्टीलरीजची एकत्रित अशी ४.५ लाख लिटर प्रतिदिन अशी क्षमता आहे. आता सॅनिटायजर्ससाठी परवानगी मिळाल्याने अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायजर्सची निर्मिती सुरू झाली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कमी आणि सवलतीच्या दरात हे सॅनिटायजर्सचे उत्पादन होणार आहे.

महाराष्ट्रातील ११९ डिस्टलरीजच्या माध्यमातून ऊसाच्या मळीपासून दारू आणि इथेनॉलचे उत्पादन याठिकाणी करण्यात येत होते. पण कोरोना व्हायरसमुळे दारूचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. म्हणूनच या डिस्टलरीजना सॅनिटायजर्स उत्पादनाचे परवाने देण्यात आले आहेत. केंद्राच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठीचे परवाने देऊ केले आहेत. त्यामुळे युनायटेड स्पिरीट लिमिटेड, ज्युबिलंट लाईफ सायन्सेस, जीबी ब्रेवरीज यासारख्या कंपन्यांनी हॅण्ड सॅनिटायजर्सचे उत्पादन सुरू केले आहे. बाजारात हॅण्ड सॅनिटायजर्सचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणूनच हे परवाने देण्यात आले आहेत. सॅनिटायजर्सचे उत्पादन जरी होत असले तरीही त्याच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॉटल्स या मेड इन चायना असल्याने ही मुख्य अडचण सॅनिटायजर्सच्या पुरवठ्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शकानुसार अवघ्या आठ दिवसात या डिस्टलरीजना परवाना देण्यात आला आहे. पण मॅन्युफॅक्चरींग युनिट्सला सध्या पॅकिंग बॉटल्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉस्पिटलला सॅनिटायजर्सचा पुरवठा करताना कॅनचा वापर करून हे सॅनिटायजर पाठवण्यात येत आहे. काही साखर कारखान्यांनी १०० एमएल, २०० एमएल, १ लिटर या स्वरूपात हॅण्ड सॅनिटायजर्स पुरवण्यात येत आहेत. काही डिस्टलरीजने सामाजिक बांधिलकी म्हणून हॉस्पिटलला हॅण्ड सॅनिटायजर देऊ केले आहे.

सध्या राज्यात सगळीकडेच सॅनिटायझरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच बाजारातील मागणीचा फायदा घेऊन अनेकांनी सॅनिटायझरचा काळाबाजार केल्याचंही उघड झालं आहे. म्हणून साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर बाजारात आल्यास लोकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. पॅकेजिंगची समस्या सोडवण्यासाठी आता प्लॅस्टिक इंडस्ट्रीजलाही पंप असणारे सॅनिटायजर्सच्या बॉटल्स बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पंपएवजी ड्रॉपर पद्धतीचे हॅण्ड सॅनिटायजर्सचा पुरवठा करण्यात येत आहे, असे एफडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सॅनिटायझर बनवण्यासाठी ७० टक्के अल्कोहोल त्यानंतर ग्लिसरीन आणि वॉटर कलरचा वापर होतो. साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे १०० मिलीलिटरपासून एक लिटरपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या कोल्हापूर साखर कारखाना तसेच पुण्याचा लोकरंजन प्रकल्प, सांगलीच्या वसंतदादा पाटील शुगर आणि राजाराम बापू साखर कारखान्यातून प्रत्यक्ष सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात झाली आहे. या साखर कारखान्यांना पुढच्या तीन महिन्यासाठी सॅनिटायझर बनवण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. सध्या या सगळ्या साखर कारखान्यातून दोन लाख लिटर म्हणजे १०० मिलीलीटरच्या तब्बल २० लाख बॉटल्स तयार होत आहेत. भविष्यातील एकूण साखर कारखाने मागितलेली परवानगी लक्षात घेता, अंदाजे चार ते पाच लाख लिटर सॅनिटायझरचं रोज उत्पादन महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकांना सहज आणि किफायतशीर किमतीमध्ये सॅनिटायझर मिळणार आहे.