मंत्रिपदाची आस नाही, पण वेळ लावू नका; मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारमधील आमदारच आतूर

Cabinet Expansion | सहा महिने निघून गेले आहेत, अनेक लोक मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले आहेत. आम्ही फडणवीस आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा, असं संजय गायकवाड म्हणाले.

Cabinet Expansion | मुंबई – मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच खदखद व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, याबाबत खुलासा करावा असा इशाराच बच्चू कडू यांनी सरकारला दिला होता. आता आमदार संजय गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही, असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा २५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

आता प्रमुख लोकांनी हे स्पष्टपणे सांगायला पाहिजे. त्याबाबतचा जनतेमधील संभ्रम दूर करायला हवा. फूल काढायचे, खिशात ठेवायचे, पुन्हा काढायचे असे करू नका. काही तांत्रिक बाबी असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगून टाकावे. अमूक एक तांत्रिक अडचणीमुळे विस्तार होऊ शकत नाही. सगळ्या ५०-६० आमदारांपैकी काहीही होणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

तर, बच्चू कडू यांच्या या वक्तव्यांचं समर्थन करत अनेकजण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, मंत्रिपदाचा विस्तार झाल्यास राज्यातील कामे जलद गतीने होतील, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. आम्ही कुणीही मंत्रिपदासाठी इच्छुक नाही. पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत, आम्ही फडणवीस आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा, असं संजय गायकवाड म्हणाले.

शिंदे गटाचा डीएनए चेक केला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, आमचा डीएनए चेक केला तर नक्कीच बाळासाहेबांचे विचारच बाहेर पडतील. मात्र, यांचा डीएनए चेक केला तर काय बाहेर पडेल? हे कोणत्या विचारांनी तिकडे गेले? जे परिवर्तन व्हायचं होतं तर सहा महिन्यापूर्वीच झालं आहे, आता खरं परिवर्तन त्यांचं होणं बाकी आहे की त्यांच्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार जाणे आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.