मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वाघाची शिकारी या वक्तव्यावर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट करत खरपूस समाचार घेतला आहे. या ट्वीटमध्ये हेमंत ढोमेने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांना टॅग केले आहे. गायकवाडांच्या वक्तव्यावर वनविभागाकडून गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत ढोमेन ट्वीटमध्ये म्हणाले, “या शिकारी बाबूच्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा. ही वन खात्याला नम्र विनंती आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे. आपले… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिले, अशी टीका केली आहे.
संजय गायकवाड नेमके काय म्हणाले?
बुलढाणा शहरात शिवजयंती (19 फेब्रुवारी) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेलेल्या मुलाखतीत त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दाताबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी गायकवाडांनी सांगितले की, माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. हा वाघाचा दात 1987 मध्ये मी वाघाची शिकार केली होती. या मुलाखतीत विचारले की, हा वाघ होता की बिबट्या यावर गायकवाड म्हणाले, वाघच…बिबट्या वगैरे मी असेच पळवतो.
हेही वाचा – Maratha Reservation: आजच्या बैठकीत ठरणार मराठा आंदोलनाची दिशा- जरांगे पाटील
वनविभागाकडून गायकवाडांवर गुन्हा दाखल
संजय गायकवाड यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाकडून गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या लॉकेटमध्ये असलेला वाघाचा दात वन विभागाकडून जप्त केला आहे. हा दात वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संजय गायकवाडांवर कायदेशी कारवाई करण्यात येणार आहे.