संजय कुमार मुख्य सचिव,अजोय मेहतांना तिसर्‍यांदा मुदतवाढ नाही

  निवृत्तीनंतर दोनदा मुदतवाढ मिळालेले राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने आता मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठतेनुसार ३० जून रोजी संजय कुमार हे पदभार स्वीकारतील. अजोय मेहता यांना मिळालेली दुसर्‍यांदा मुदतवाढ ही 30 जून रोजी संपत असून, पुढील मंगळवारी संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव होतील, अशी खात्रीलायक माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली. 1984 च्या बॅचचे कुमार हे मेहता यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ असून त्यांच्या खालोखाल 1985 च्या बॅचचे प्रवीणसिंह परदेशी आणि सीताराम कुंटे हे शर्यतीत होते. याबाबत सरकारने बुधवारी रात्री उशीरा संजय कुमार मुख्य सचिव असल्याचे पत्रक काढले.

राज्याच्या मुख्य सचिव पदावरून मेहता यांना दूर सारले तरी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार राहणार असल्याने ते सत्ता केंद्रात राहतील. त्यांच्या सल्ल्यावरच यापुढे राज्य चालणार अशी आताच चर्चा सुरू झाली आहे. यापुढे राज्य एक आणि दोन सचिव अशा पद्धतीने राज्य चालणार का, असा सवाल विरोधी पक्षांकडून आताच केला जात आहे. मेहता यांना एका हाताने दूर केले, पण दुसर्‍या हाताने जवळ करत मुख्यमंत्री विभागाची सूत्रे देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना जीवदान नव्हे तर ते आपले खास अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे. मुंबई पालिकेचे आयुक्त झाल्यानंतर मेहता यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह ‘मातोश्री’चा विश्वास संपादन केला होता, तो आता कामी आला. त्यामुळे मेहतांचे उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न निकाली निघाला आहे.

संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून गृहविभागाचाही अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे. राज्यात प्रशासकीय गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो त्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांची दालने आहेत. मात्र ठाकरे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून मागील सहा महिन्यात अजोय मेहता यांनीच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना आपणच सुपर सीएम असल्याचे दाखवून दिले होते. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्रीही नाराजी व्यक्त करतात.

मात्र सध्याचे ठाकरे सरकार हे मेहताच हाकत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांप्रमाणे सनदी अधिकार्‍यांमध्येही नाराजी होती. त्यामुळे तिसर्‍यांदा पुन्हा मुदतवाढ दिल्यास करोनासोबतच्या काळात नवीन संकट निर्माण होईल या भीतीपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिसर्‍यांदा मुदतवाढ न देता मेहता यांना आपल्यासोबतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहता हे मुख्य सचिवपदावरुन निवृत्त झाल्यानंतर लगेचच १ जुलैपासून मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. तसेच त्यासोबत मेहता यांच्या खांद्यावर राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी समन्वयक म्हणूनही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

पत्रक जारी

मेहता यांच्या 34 वर्षे प्रशासकीय कामाच्या अनुभवाची राज्याला गरज असून मेहतांसारखा टास्कमास्टर अधिकारी असल्यास राज्यशकट हाकण्यास मदत होईल, या भावनेतूनच मेहता यांची निवृत्तीनंतर मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लावली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले. मेहता यांना आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही हे जून महिन्याच्या सुरूवातीलाच लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या विश्वासातील सनदी अधिकारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये नेमले आहेत. पुढील चार दिवसांतही अनेक सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत असे मुख्यमंत्री कार्यालयाने पत्रकाद्वारे कळविले आहे. यासाठी त्यांना मंत्रालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ दिले जाईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणार्‍या व्यक्तीची नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आता ते प्रामुख्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील.