संजय पांडेच राहणार पोलीस महासंचालक, राज्य सरकार वापरणार आंध्र प्रदेशचा फॉर्म्युला

mumbai police commissioner sanjay pandey has written letter to citizens of mumbai and share private number
मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचे मुंबईकर जनतेस पत्र, तक्रार करण्यासाठी शेअर केला खासगी मोबाईल नंबर

मुंबई – केंद्राने महाराष्ट्राचे विद्यमान प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे महाराष्ट्राचे महासंचालक पदाच्या यादीतून नाव हटवले आहे. मात्र, संजय पांडे यांच्या पाठीशी ठाकरे सरकार ठाम आहे. त्यामुळे संजय पांडे हेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य सरकार आंध्र प्रदेशचा फॉर्म्युला वापरणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

संजय पांडे हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आयोगाने उत्तर दिले असून पांडे यांच्या नावावर फुली मारली आहे. आयोगाने पांडे यांच्या जागी तीन अधिकार्‍यांच्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा समावेश आहे. आयोगाने ज्यांच्या नावांची शिफारस केली आहे, त्यामध्ये १९८८ च्या बॅचचे रजनीश सेठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते डिसेंबर २०२३ मध्ये निवृत्त होतील.

१९८८च्या बॅचचे के. व्यंकटेशम नागरी संरक्षणाचे प्रमुख म्हणून काम करतात. मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे हे १९८७ च्या बॅचचे असून ते सप्टेंबर २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत. ज्या नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यापैकीच एकाची नियुक्ती करावी लागते असे सांगितले जाते. यासाठी आयपीएस अधिकारी प्रकाशसिंग प्रकरणाचा हवाला दिला जातो. प्रकाशसिंग यांच्यासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीतील एकाची नेमणूक करावी, असा निवाडा दिला आहे. पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीची निवड राजकीय मर्जीनुसार होऊ नये, यासाठी तरतूद केलेली आहे. परंतु, काही राज्यांनी लोकसेवा आयोगाचा सल्ला न घेता महासंचालकाची निवड केली आहे. काही राज्यांनी आयोगाच्या शिफारशी धुडकावून लावल्याची उदाहरणेही आहेत.

यात प्रामुख्याने उदाहरण द्यायचे झाल्यास आंध्र प्रदेशमधील २०१७ च्या प्रकरणाचा हवाला देता येऊ शकतो. आंध्र प्रदेश सरकारने २०१७ साली नंदुरी संबा सिवा राव यांच्या नावाची दुसर्‍यांदा शिफारस केली होती. मात्र, युपीएससीच्या पॅनेलने नंदुरी संबा सिवा राव यांचा कार्यकाळ संपत असल्याने पुन्हा महासंचालकपदी नको असे सांगत त्यांच्या नावावर फुली मारली होती. परंतु, आंध्र प्रदेश सरकारने आयोगाच्या शिफारसीला केराची टोपली दाखवत नंदुरी संबा सिवा राव यांना पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. या पद्धतीने राज्य सरकार देखील संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदी कायम ठेवतील. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर परमबीर सिंह यांना काढून टाकण्यात आल्यानंतर नगराळे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांना प्रभारी पोलीस महासंचालक बनवण्यात आले. संजय पांडे हे ३० सप्टेंबर २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तपदी होऊ शकते नियुक्ती

राज्यात २०२२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राज्य सरकार संजय पांडे यांना पोलीस महासंचालक पदावर कायम ठेवेल. जर संजय पांडे यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती केली जाऊ शकते. मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची हे राज्य सरकार ठरवते. तसेच, संजय पांडे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात शिवसेना आग्रही राहील. सत्ताधार्‍यांना आपल्या मर्जीतील अधिकारी हवे असतात.

परमबीर सिंह प्रकरणात संजय पांडे यांनी जे काम केले आहे ते पाहता महाविकास आघाडी सरकार त्यांच्या नियुक्तीसाठी ग्रीन सिग्नल देईल. त्यामुळे संजय पांडे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त करून हेमंत नगराळे जे आता मुंबई पोलीस आयुक्त आहेत त्यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. संजय पांडे यांनी मुंबईत पोलीस उपायुक्त, होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, होमगार्डचे महासंचालक पदी काम केले आहे.