संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई

1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगावातील पत्राचाळ जमीन घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केलीय.

Sanjay Raut

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्यानं एकच खळबळ उडालीय. अलिबागमधील 8 जागा आणि दादरमधील एक प्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केल्याची माहिती ईडीनं दिलीय. विशेष म्हणजे ही सगळी मालमत्ता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आणि त्यांच्या मित्र परिवाराची आहे.

1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगावातील पत्राचाळ जमीन घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केलीय. पत्राचाळ घोटाळ्यातील काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. या भूखंडांची किंमत साधारणतः 60 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत सत्येंद्र जैन यांचे कुटुंब आणि संजय राऊत यांच्या पत्नीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली. दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत, ज्यात ईडीने कारवाई केली आहे. यातील एक प्रकरण शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीशी संबंधित आहे, तर दुसरे प्रकरण आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे.
पहिले प्रकरण पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. यामध्ये ईडीने 11 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर 2 कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नीची आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त केली. यामध्ये अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी संजय राऊतचा मित्र प्रवीण राऊत यालाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले होते. चौकशीत ईडीला मालमत्तेच्या खरेदीत गुन्ह्याचा मार्ग अवलंबल्याचे आढळून आले होते. दुसरे प्रकरण आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. यामध्ये 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबातील सदस्य अशा काही फर्मशी संबंधित होते, ज्याची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यात Akinchan Developers प्रायव्हेट लिमिटेड, Indo Metal impex प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर, यशवंत जाधव, राहुल कनाल या शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर खात्याने छापे टाकले होते. त्यानंतरही शिवसेना नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत वारंवार भाजप, आयटी आणि ईडीवर हल्ला चढवला होता. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधी झुकणार नसल्याचंही त्यांनी सांगितले होते. पण अखेर आज त्यांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. बिगर भाजपशासित राज्यांत ईडीकडून अशाच प्रकारची कारवाई होत असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची ओरड आहे. महाराष्ट्रात ईडीनं विशेष करून शिवसेनेच्या नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात लक्ष्य केलं आहे. त्यामुळेच ईडीच्या या कारवाईमुळे राजकारण आणखी तापणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.