संजय राऊतांची निवडणूक आयोगाला शिवीगाळ, म्हणाले “शिवसेना तुमच्या बापाची का?…”

गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांची अनेकदा जीभ घसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच ते विधिमंडळाला "चोरमंडळ" असे म्हणाले होते. पण आता तर त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच शिवीगाळ केली आहे, ज्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut abused the Election Commission

शिवगर्जना यात्रेनिमित्त संजय राऊत यांनी सांगली येथे हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पण या कार्यक्रमात देखील संजय राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी निवडणूक आयोगासाठी खालच्या भाषेतला शब्द वापरला. ज्यामुळे आता पुन्हा एकदा राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, “संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके घेऊन पळून गेले आहेत आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, शिवसेना तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?”, अशा खालच्या भाषेतील शब्दाचा वापर करत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

दरम्यान, याप्रकरणी प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, मी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ द्या. निवडणूक आयोगाला फक्त मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शिव्या घालत आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कागदावर आहे. निवडणूक घ्या म्हणजे जनताच ठरवेल की, खरी शिवसेना कोणाची आहे .’

संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला केलेली शिवीगाळ याबद्दलचा मुद्दा भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत देखील उपस्थित केला. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची सभागृहाने नोंद घ्यावी, अशी मागणी शेलारांकडून करण्यात अली. तर सभागृहाच्या बाहेर कोण कोणाला किंवा कोणत्याही संस्थेला काहीही बोलले तरी त्याचा इथे संबंध नाही, त्यामुळे असे मुद्दे या सभागृहात उपस्थित करण्यात येऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

कोल्हापूर येथे देखील शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुद्धा पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हंटले होते. ज्यामुळे राऊत यांच्या या शब्द प्रयोगावर हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. याप्रकरणी त्यांना हक्कभंग चौकशी समितीकडून नोटीस देखील पाठवण्यात आली. पण आपण दौऱ्यावर असून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे उत्तर संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता या समितीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – “पुण्याची हवा बदलली…”; कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला