ईडीने चौकशी केलेल्या कंपनीकडून सोमय्यांच्या संस्थेला निधी, राऊतांचा सोमय्यांवर आरोप

sanjay raut accuses on kirit Somaiya funding Somaiya's organization from company investigated by ED

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर घोटाळे केल्याचा आरोप केला आहे. तर सोमय्यांच्या घोटाळ्यांची आता प्रकरणेच संजय राऊत यांनी समोर आणली आहेत. तसेच ईडीच्या चौकशीवरसुद्धा संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शौचालय घोटाळ्यानंतर आता राऊतांनी सोमय्यांच्या संस्थेला त्या कंपनीकडून मिळालेल्या निधीबाबत प्रश्न केला आहे. ईडीने चौकशी केल्यानंतर त्याच कंपनीकडून मोठी रक्कम सोमय्यांच्या संस्थेला मिळाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेल्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोप केला होता. यामध्ये सोमय्यांच्या अडचणीसुद्धा वाढल्या होत्या परंतु न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलावर दूर झाली. मात्र राऊतांनी आता सोमय्यांवर दुसरा आरोप करत ईडीच्या चौकशीवरसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, किरीट का कमाल, किरीट सोमय्यांनी २०१३- २०१४ मध्ये त्या कंपनीवर आरोप केले होते. त्या कंपनीच्या प्रमुखाची ईडीद्वारे चौकशी करण्यात आली आहे. यानंतर त्याच कंपनीकडून २०१८-१९ मध्ये किरीट सोमय्या यांच्या संबंधित असलेल्या युवक प्रतिष्ठानला मोठी रक्कम देण्यात आली आहे. तुम्ही घटनाक्रम समजून घ्या असे म्हणत सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

ही खंडणी नाही का?

दरम्यान संजय राऊत यांनी याच आरोपासंबंधित आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या कंपन्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर आहेत. त्यांच्याकडून सोमय्यांच्या संबंधित असलेल्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो कसा? हा काळा पैसा पाढरा करण्याचा घाणेरडा डाव आहे का? असा सवाल करत हिशोब तर द्यावा लागेले असे संजय राऊत म्हणाले आहेत. याबाबत आपण तपास यंत्रणांकडे तक्रार केली आहे. असे राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : डी कंपनीच्या शार्प शूटर आणि तस्करांच्या 20 ठिकाणावर एनआयएचे छापे