शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे?, काश्मिरामध्ये पंडितांचा आक्रोश. कारसेवकाच्या हत्या करणाऱ्या मौ.मुलायम यांना पद्मविभूषण दिला जातो. मग हिंदू आक्रोश करणारच, असे ट्विट करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

संग्रहित छायाचित्र

मुंबईः शिवसेना भवन हेच हिंदुंचे एकमेव आशास्थान आहे हे सकल हिंदू समाज आक्रोश मोर्चाने सिद्ध केले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी भाजपला हाणला.

खासदार संजय राऊत यांनी टिट्व करून भाजपवर टीका केली. आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे?, काश्मिरामध्ये पंडितांचा आक्रोश. कारसेवकाच्या हत्या करणाऱ्या मौ.मुलायम यांना पद्मविभूषण दिला जातो. मग हिंदू आक्रोश करणारच, असे ट्विट करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा मुंबईत निघाला. दादर येथील शिवसेना भवनासमोरून हा मोर्चा निघाला. या मोर्चात भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यावेळी मोर्चेकरींनी लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी केली. त्याचवेळी भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे व विरोधकांवर टीका केली. भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. बेकायदेशीर धर्मांतर होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. या मागणीसाठीच सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

तर आमदार नितेश राणे म्हणाले, सर्व हिंदुंनी एकत्र येऊन काढलेला हा मोर्चा ऐतिहासिक आहे. मुंबईतून हिंदुंना हद्दपार करण्याचा डाव आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला होता. गेली तीन वर्षे हिंदुंवर अन्याय सुरु आहे. त्याला या मोर्चातून उत्तर मिळाले आहे. तसेच विरोधकांनी या मोर्चावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लिव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरले. लव्ह जिहाद म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माची अवहेलना करायला शिकवत नाही. घरातून बाहेर पडताना माणूस म्हणून बाहेर पडा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

हा मोर्चा शिवसेना भवन जवळून निघाला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली. या टीकेला अद्याप तरी भाजपच्या कोणत्याच नेत्याने उत्तर दिलेले नाही.