मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही बहुमत मिळालेल्या महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आलेला नाही आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावरून आता विरोधकांनी सत्तेत बसणाऱ्या भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, राज्यात आणि देशात सुरू असणाऱ्या घटनाबाह्य राजकीय गोष्टींना सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील काळजीवाहू सरकारवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले असून सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला आहे. (Sanjay Raut alleges that country was on fire due to unconstitutional work of former Chief Justice DY Chandrachud)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 01 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील काळजीवाहू सरकारवर टीका करत माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना खडेबोल सुनावले. याबाबत ते म्हणाले की, माजी सरन्यायाधीस डीवाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल किंवा संभलचा विषय असेल याबाबतीत अत्यंत घटनाबाह्य काम करून देशामध्ये आग लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिले, त्यामध्ये डीवाय चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. हे काळजीवाहू सरकार हे सुद्धा संविधानाच्या विरोधात आहे. 26 तारखेला विधानसभेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे 26 तारखेलाच नवीन सरकार स्थापन होणे हे घटनेनुसार आवश्यक होते. मात्र सरकारचे भाडोत्री कायदेपंडित आता काहीही कागद आणून दाखवतील. पण त्या जागी आम्ही असतो तर एव्हाना आम्ही राष्ट्रपती राजवट लावली असती, असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, अद्यापही कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून 10 दिवस होऊन गेले आहेत. बहुमत असल्याने 24 तासांच्या सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता. पण अद्याप यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केलेला नाही?. अद्याप मुख्यमंत्री कोण? भाजपाचा विधीमंडळ पक्षाचा नेता कोण? यासंदर्भात निर्णय झालेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतके मोठे बहुमत तरीही विधीमंडळ नेता ते अजून निवडू शकले नाही. अजूनही सरकार स्थापनेचा दावा केला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना कोणी भेटले नाही आणि राज्यपालही हे काळजीवाहू सरकार चालू देतात, असे म्हणत राऊतांनी राज्यपालांनाही टोला लगावला आहे.
तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घोषणा करतात की, पाच तारखेला शपथविधी होणार ते राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का? सरकार स्थापन करण्याचा दावा अजून केलेला नाही तुम्ही घाबरले आहात का? ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेचप्रसंग काळजीवाहू सरकारच्या बाबतीतसुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे. याला सर्वस्वी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.