Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानींचा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप

Sanjay Raut : शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानींचा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप

Subscribe

अमेरिकेने गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप केले आहेत. ज्यानंतर या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अदानींवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई : अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एसईसी या सरकारी संस्थेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य काही सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टचाराचे आरोप अमेरिकेने केले असून या प्रकरणी त्यांच्याविरोधात अमेरिकेत अटक वॉरंटही काढण्यात आला आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर अदानींचे शेअर्सही कोसळले आहेत. ज्यानंतर आता याच प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अदानी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut alleges that Gautam Adani is doing corruption along with Eknath Shinde, Devendra Fadnavis)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 21 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. ज्याबाबत उत्तर देत ते म्हणाले की, अमेरिकेत अदानींविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यानंतर त्या प्रशासनाने अदानींविरोधात अटक वॉरंट काढले आहे. 250 मिलियन डॉलरचा भ्रष्टाचार, लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, केवळ टेंडर मिळवण्यासाठी. महाराष्ट्रात धारावी असेल, एअरपोर्ट असेल किंवा अन्य काही महत्त्वाची टेंडर असतील किंवा एमएससीबी असेल त्यामध्ये सुद्धा गौतम अदानीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संगनमत करून, भ्रष्टाचार करून या सगळ्या जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Gautam Adani : अदानी पुन्हा फसले, अमेरिकेने भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारखे गंभीर आरोप लावले

तसेच, आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या भीतीने त्यांनी विधानसभेत आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड पैसा टाकलेला आहे. पण गौतम अदानींवर झालेले आरोप हे देशासाठी, मोदींसाठी आणि संपूर्ण भाजपासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. अदानी यांच्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशाला एक डाग लावलेला आहे. हिंडनबर्ग वगैरे सर्व काही सुरू असताना त्यांना क्लीन चीट देणारे हेच लोक (भाजपा) आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा हेच सांगितले की, आम्हाला महाराष्ट्राला अदानी राष्ट्र नाही बनू द्यायचे. महाराष्ट्रात धारावीपासून ते विमानतळापर्यंत सर्व काही अदानीला विकण्यात आले आहे, असा आरोपही खासदार राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

तर, महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी अदानींनी 2000 कोटी रुपये खर्च केले, असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमचे सरकार आले तर आम्ही अदानींविरोधात चौकशी करू, अदानींविरुद्ध किमान 100 एफआयआर नोंदवल्या जातील, असेही संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ज्यानंतर आता राऊतांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -