मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. महायुतीकडून मविआला चारीमुंड्या चीत करण्यात आले आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा काहीसा निर्णय लागला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. तर महायुतीच्या कार्यालयांमध्ये जल्लोष सुरू आहे. पण महाविकास आघाडीच्या पराभवाला नेमके कोण जबाबदार आहे? मविआच्या पराभवाची कारणे काय आहेत? हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. रविवारी (ता. 24 नोव्हेंबर) खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मविआच्या पराभवाला जबाबदार व्यक्तीचे नाव सांगितले आहे. (Sanjay Raut alleges that Mahavikas Aghadi was defeated because of CJI Dhananjay Chandrachud)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, जसे हरयाणात झाले. पहिल्या दोन तासांत जी लढाई बरोबरीने सुरू होती, ती अचानकपणे पुढल्या दोन तासांत निकाल लागले, ते संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असे होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, मतदान नंतर होऊ दिले. तरीही महाराष्ट्रातल्या घडामोडीला कोणी जबाबदार असेल तर ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. कारण देशाचे सुप्रीम कोर्ट ज्यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. तो त्यांनी दिला नाही. मग हे कशा करता बसलेले आहेत? अडीच तीन वर्ष निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाकरता उबवताय? सरकारवर का ओझं म्हणून जनतेच्या पैशाचा चुराडा करताय? असे एक ना अनेक प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आले.
हेही वाचा… Maharashtra Politics : नवे मुख्यमंत्री कोण? सुनील तटकरेंचा मोठा दावा…
तर, उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे धनंजय चंद्रचूड हे चांगले प्राध्यापक आहेत, भाषणे देण्यासाठी चांगले आहेत. पण घटनात्मक पेचावर ते निर्णय देऊ शकले नाहीत, यासाठी इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही, असा संताप राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, जर का माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातले चित्र बदलले असते. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षातरांसाठी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कोणीही कशाही उड्या मारेल, विकत घेऊ शकेल. कारण कायद्याची, 10 व्या शेड्युलची भितीच राहिलेली नाही आणि न्यायमुर्तींनी ही भिती घालवली आहे. या सगळ्या घटनेला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत, इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिले जाईल, असे राऊतांनी म्हटले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आता महायुतीच्या नेतेमंडळींकडून नेमके काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.