मुंबई : 17 सप्टेंबरला मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मराठवाड्यातील मंत्र्यांना जिल्हे नेमून देण्यात आले असून या सोहळ्याची जोरदार तयारी राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. याच दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याशिवाय उद्या शनिवारी (ता. 16 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असून महत्त्वाची बाब म्हणजे या पत्रकार परिषदेला ‘सामना’चे संपादक संजय राऊत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वतः संजय राऊत यांच्याकडून हे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut and CM Eknath Shinde will face each other in a press conference)
हेही वाचा – शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये; होणार कोट्यवधींच्या पॅकेजची घोषणा
आज (ता. 15 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, राज्यातील राजकीय स्थितीबाबतचा निकाल चाळीस दिवसांत लागणे अपेक्षित होते. त्यावर अद्याप काहीही झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी सरकार बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत. त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागले, अशी टीका राऊतांकडून करण्यात आली.
तर छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोणासाठी खर्च केला याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल, त्या बैठकीला एक पत्रकार म्हणून जाणार आहे, असे त्यांच्याकडून पत्रकारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ‘रोखठोक सामना’ पाहायला मिळणार आहे.
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, संभाजीनगरमधे उद्या सगळे हॉटेल्स बुक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स बुक केल्या असल्याची माहिती आहे. कोण करते एवढा खर्च हे शोधावे लागले. तर अमित शहांचे आम्हाला जोरदार स्वागत करायचे होते, पण त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याने आमच्या सगळ्या तयारीवर पाणी फेरले असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.