घर महाराष्ट्र जालन्यातील मराठा आंदोलन चिरडल्यानंतर संजय राऊतांचे सरकारवर शरसंधान

जालन्यातील मराठा आंदोलन चिरडल्यानंतर संजय राऊतांचे सरकारवर शरसंधान

Subscribe

जालन्यातील घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे.

Jalna Maratha Protest : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला काल (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होते. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्याचवेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने…, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

- Advertisement -

या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. काल झालेल्या या घटनेनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काही भागात जाळपोळ करण्यात आली. ज्यामुळे आता मराठा आंदोलक हे हिंसक झालेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत काल INDIA आघाडीची बैठक सुरू होती. या बैठकीवरून सर्वांचे दुर्लक्ष व्हावे, म्हणून ही घटना घडवून आणल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी या घटनेबाबत आपले मत व्यक्त केले. (Sanjay Raut attack on the government after crushing the Maratha movement in Jalna)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री कोण आहेत? खाते कुणाकडे आहे? आमच्या सरकारमध्ये आंदोलने झाली. पण कधी लाठीमार केला नाही. या आंदोलकांवर हल्ला का केला? यामागे राजकीय सुसूत्रता आहे. मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. देशातील जनता या इंडियाच्या बैठकीकडे लक्ष देऊन होती. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषण सुरू होती. सर्व चॅनलवर दाखवले जात होते. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीमार करून गोंधळ निर्माण केला गेला, असा दावा राऊतांकडून करण्यात आला.

- Advertisement -

शिंदे- फडणवीस सरकारचे फ्रस्ट्रेशन या घटनेतून बाहेर आले आहे. त्यांची अस्वस्थता बाहेर आली. नाही तर असा हल्ला करण्याचे कारण नव्हते. या आंदोलनात तरुण मुले, अबालवृद्ध आणि लहानमुले होती. अशावेळी संयम राखता आला असता. पण वातावरण चिघळू दिले. हल्ला घडवून आणला, जे या सरकारला करायचेच होते, असा आरोपही राऊतांनी केला. त्यामुळे कालच्या घटनेनंतर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाच, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -