पुणे : राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राजकारण्यांना वेध लागले आहे ते स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे. त्यामुळे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत मोठे विधान केले आहे. सर्वच ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जाणार नाही, याबाबतचा निर्णय त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत मिळून घेतला जाईल, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut big statement about fighting local self-government bodies on their own)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 27 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातून राऊतांनी संवाद साधत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड या भागातील आणि पुर्णतः जिल्ह्यातीलच पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठका घेणार आहोत. विधानसभा, लोकसभा निवडणुका आता संपलेल्या आहेत. विधानसभेत आम्ही जिंकलो आणि लोकसभेत आम्ही पराभूत झालो. त्याची कारणे काय आहेत, हे संपूर्ण देशाला समजलेले आहे. तरी त्या पराभवाने खचून न जाता पुढील प्रत्येक निवडणुका या आम्हाला लढवाव्याच लागतील. त्यादृष्टीने ही तयारी सुरू आहे, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Thackeray Vs Shinde : धाराशिवमध्ये ऑपरेशन ‘टायगर’, ठाकरेंचे खासदार अन् आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर?
तसेच, जो स्वबळाचा नारा दिला, असे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी जी तीन प्रमुख पक्षांची आणि अन्य घटक पक्षांची आहे, त्यामध्ये फूट पडली किंवा ती संपली असे होत नाही. स्वबळाचा विषय हा फक्त मुंबईपुरत्या शहरासाठी आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून आणि मुंबईवर अनेक वर्षांपासून शिवसेनेचा पगडा आहे. ते मोठे शहर आहे. अनेक राज्यही इतकी मोठी नाहीयेत. तिथले प्रश्न, तिथली बांधणी ही वेगळी आहे. शिवसेनेने मुंबईवर सातत्याने सत्ता आणि पकड ठेवली आहे. त्यामुळे ती तशीच ठेवण्यासाठी मुंबईत स्वबळाने लढले पाहिजे, असे तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या आहेत. पण ही परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये असेल का? त्याविषयी साशंकता आहे, असेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केले.
तर, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा अन्य भाग असेल तिथे तिन्ही पक्षांच्या लोकांचे म्हणणे आहे की आपण एकत्र लढणे गरजेचे आहे. तिथे त्या त्या कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. नक्कीच कोणताही मागचा म्हणजेच विधानसभांचा भूतकाळ लक्षात घेऊन त्याची चिंता न करता आम्ही या निवडणुकांना सामोरे जाऊ. मुंबईतील गट प्रमुखांनी आपले मन मोकळे करत आपली भूमिका मांडली. पण इतर भागातील परिस्थिती किंवा इतर भागातील भूमिका वेगळी आहे. अनेक ठिकाणी आघाडीतील इतर पक्ष ताकदीचे आहेत, त्यामुळे स्वबळाचा निर्णय ठिकाण पाहू घेऊ, असे म्हणत खासदार राऊतांनी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या निर्णयाबाबत मोठे विधान केले आहे.