शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू; खासदार संजय राऊतांचं मोठं विधान

sanjay raut

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, अशा प्रकारचं मोठं विधान संजय राऊतांनी पुण्यातील प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे.

शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू

शरद पवार आणि शिवसेनेचे संबंध याबाबत बोलताना संजय राऊतांनी बाळासाहेबांचा हवाला दिला. यावेळी राऊत म्हणाले की, शरद पवार आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेबांची विशिष्ट्य अशी भूमिका होती. त्यांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, ही भूमिका बाळासाहेबांनी अनेकदा मांडल्यांचं राऊतांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान पदाबाबत २०२४ मध्ये बोलू

या देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद आणि क्षमता ही शरद पवार यांच्यामध्ये आहे. मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नसून त्यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत बोलत आहे. परंतु आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदाबाबत २०२४ मध्ये बोलू, असं राऊत म्हणाले.

मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो, त्यांना म्हणालो की, काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. कारण महाराष्ट्रात बदल करण्याचं सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात आहे. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर झालेलंच आहे. जसं प्रयागराजचं नामकरण केलं तसं केंद्रानं औरंगाबादचंही नामकरण करावं, तसा प्रस्ताव राज्यातून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : अपक्ष आणि इतर पक्षांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआयची भीती दाखवतेय; संजय राऊतांचा गंभीर आरोप