दाऊद तुमच्यासमोर मच्छर, त्याला पकडून आणा

संजय राऊत यांचे मोदी सरकारला आव्हान

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात येत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. दाऊद कुठे आहे आणि काय करीत आहे हे केंद्र सरकारला ठाऊक आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे. त्याला पकडून घेऊन या, असे संजय राऊत म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने आधी दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसे केंद्रातील मोदी सरकारने दाऊदची गचांडी पकडून मुंबईत आणले पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे? मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. त्यानंतर त्याला पकडून येथे घेऊन यावे. केंद्रातील तुमचे नेते तर जगातील सर्वांत मोठे नेते आहेत. त्यांच्यासमोर दाऊद मच्छर आहे.

विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची शनिवारी दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाऊंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होते असे पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाचे हे निरीक्षण बाहेर येताच विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे.