पुणे : भाजपाने दोन वर्षांपूर्वी मिशन लोटस राबवत महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम केले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. पण आता या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर करण्यासोबतच मोठा दावा केला आहे. भाजपाला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा सुद्धा पक्ष फुटू शकतो, असा दावा राऊतांकडून करण्यात आलेला आहे. परंतु, त्यांनी पक्ष फुटीबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Sanjay Raut claims that BJP will break party of Chandrababu Naidu and Nitish Kumar too)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 27 जानेवारी) पुण्यातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी आधी पण सांगितले त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटात नवा उदय होणार आहे. मला कोणाचेही नावं घ्यायचे नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडला जाईल. कारण भाजपाला ही पक्ष फोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही. देशभरात हाच प्रकार चालू आहे. चंद्राबाबूंचा पक्षही फोडला जाईल. नितीश कुमार यांचाही पक्ष फोडला जाईल. यांच्या दाताला, जिभेला पक्ष फोडण्याचे रक्त लागले आहे. भाजपाला ही चटक लागली आहे, त्यामुळे हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याबाबत राऊतांचे मोठे विधान
यावेळी त्यांना भाजपा शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता आहे का? असा सवाल विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, हा जुना प्रश्न आहे. त्यात काही तथ्य नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राची लूट करून गुजरातला जात आहेत. त्यांच्याशी हातमिळवणी करायला सांगता? ते मराठी माणसाच्या रक्तात नाही, असा टोला लगावत राऊतांनी उत्तर दिले आहे. तसेच, पुण्यात नोकरभरतीवेळी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावरूनही राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. हिंजवडी किंवा पुण्यातील भाग आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली असे सांगितले जाते. पण राज्यासह देशातील बेरोजगारी कशी रस्त्यावर आहे हे काल दिसले, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला.
तर, काही मोजक्या जागांसाठी आयटी क्षेत्रातील पाच हजारापेक्षा अधिक इंजीनिअर रस्त्यावर होते. म्हणजे आयटी क्षेत्रातील हजारो तरुण बेरोजगार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून परकीय गुंतवणूक आणतात. रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खरंतर राज्यातील बेरोजगारीची श्वेतपत्रिका काढा. हिंजवडीत सहा हजार आयटी क्षेत्रातील पदवीधर रस्त्यावर होते. मोदी म्हणतात यांनी पकडो तळावे. तुम्ही या इंजीनिअरला पकोडे तळायला लावणार का फडणवीस? हे राज्यातील चित्र आहे, असा संताप यावेळी खासदार संजय राऊतांनी यांनी व्यक्त केला.