Homeमहाराष्ट्रSanjay Raut : वाल्मीक कराड काही दिवसांनी राजकारणात येईल आणि, राऊतांचा खळबळजनक...

Sanjay Raut : वाल्मीक कराड काही दिवसांनी राजकारणात येईल आणि, राऊतांचा खळबळजनक दावा

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (ता. 27 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त करत मोठे भाष्य केले आहे.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (ता. 27 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज मंगळवारी (ता. 28 जानेवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात काहीच होणार नसून काही दिवसांनी वाल्मीक कराड राजकारणात तेही भाजपात दिसेल, असा दावा राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut claims that Walmik Karad will appear in politics with BJP after few days)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वाल्मीक कराड प्रकरणावर भाष्य करत म्हणाले की, असे काहीही होणार नाही कारण अंजली दमानिया यांच्या आधी बीडमध्ये अनेक लोक आंदोलन करत होते, पण काही झाले नाही. या विरोधात लोक रस्त्यावर आले, पण काही झाले नाही. बीडमधल्या दहशतवादाविरोधात सुरेश धस यांचे तांडव सुरू आहे. हे तांडव शासकीय आशिर्वाद असल्याशिवाय ते होऊच शकत नाही. तरीही आज वाल्मीक कराड हा रुग्णालयात आहे. त्यांचे काय दुखत आहे हे माहीत नाही. पण त्याच्यासाठी रुग्णालयातला एक मजला रिकामा करण्यात आलेला आहे, इतर अनेक सोयी सवलती त्याला मिळत आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवारांना दिसत नाही का? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा… Sanjay Raut : या देशात न्यायाची अपेक्षा नाही, राऊतांनी व्यक्त केला संताप

तसेच, वाल्मीक कराडशी संबंधित सर्व गोष्टी या धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असे भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय अंजली दमानिया यांचाही भाजपाशी संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल. त्यामुळे आज काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मीक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपाच्याच गटामध्ये बसलेले असतील. सुरेश धस यांचे ऐकले पाहिजे, कारण ते सरकार पक्षातील आमदार आहेत, शिवाय त्या जिल्ह्यातील प्रतिनिधी आहेत. त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे आम्ही याबाबत मुंबईतून बोलणे योग्य नाही, असे यावेळी संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.