मुंबई : विधानसभा निवडणुकांनंतर आता पुढील काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांना वाटतं की, पुढील निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढतीनेच कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवता येईल. यासंदर्भात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sanjay Raut clarifies his stance on contesting the Mumbai Municipal Corporation elections on his own)
आज, (गुरुवारी 28 नोव्हेंबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ठाकरे गट पुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या बातम्या निराधार आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळालं. आमच्यासाठी 30 हून अधिक जागा जिंकणं ही खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, असं कुणालाच वाटलं नाही. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जर कुणी असं म्हणत असेल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. जे उमेदवार पराभूत झाले, ते असं म्हणू शकतात की, आम्हाला काही फायदा झाला नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
हेही वाचा – Congress Vs ECI : शेवटच्या टप्प्यात मतदान कसे वाढले, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मागितला पुरावा
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुकांना वेळ आहे. त्यामुळे या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा आम्ही विचार करू. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या असतात, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यामुळे आता ठाकरे गट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत लढणार हे पाहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा समोर
दरम्यान, ईव्हीएम घोटाळ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा समोर आला आहे. या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्यामुळे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांची अवस्था वाईट झाली. आमच्यासह काँग्रेस आणि शरद पवार गटालाही याचा फटका बसला. याप्रकरणी आम्ही तिघानीही एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. आता आमच्यासमोर मुंबई महानगर पालिका आणि राज्यातील पुणे, नाशिकसारख्या 14 महानगरपालिका निवडणुकांचं आव्हान आहे. त्यात मुंबई महानगरपालिका हे सर्वात मोठं आव्हान आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – Thackeray group vs BJP : कपट-कारस्थाने चालूच आहेत, कारण…, ठाकरे गटाकडून भाजपा लक्ष्य