
Sanjay Raut Counter to Raj Thackeray | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल, बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कात भव्य जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत राज ठाकरेंनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना पक्षात फूट पडण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी अप्रत्यक्षपणे ठेवला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. १८ वर्षांनंतरही राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, असं ते म्हणाले. आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर प्रशासनाची तत्काळ कारवाई, माहिममधील अतिक्रमणावर हातोडा
मनसेला १८ वर्षे होऊन गेले. पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय चाललंय हे माहीत नाही. पण, १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत. उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदेही उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, नारायण राणेही इतक्या वर्षांनी उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत. भाजपाही उद्धव ठाकरेंवर बोलत आहे. स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत. याचा अर्थ सगळ्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटतेय. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. अमृतपाल पंजाबातून महाराष्ट्रात येऊन लपला आहे. त्यावर कोणी बोलत नाही. पण तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवेसनेवर आहेत. यावरूनच उद्धव ठाकरेंची धास्ती आणि भय कायम आहे हे स्पष्ट आहे. २० वर्षे झाली तुमचा पक्ष कुठे आहे यावर काम करा. महाराष्ट्राचे, देशाचे प्रश्न पाहा. काय रोज उद्धव ठाकरेंवर बोलत आहात? उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्यावर पाठीमागून यांचं वऱ्हाड येतं. आम्हाला आमची ताकद, क्षमता माहिती आहे. आम्हाला लोकपाठिंबा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
देशभरातील जनतेची भावना आहे की बॅलेट पेपरवर मतदान व्हावं. ज्यांना मतदान करतोय ते संबंधिताला पोहोचतोय की नाही अशी शंका आहे. जगभरात ईव्हीएम रद्द करून बॅलेट पेपरवरच मतदान होत आहेत. रशिया आणि युएईमध्येही बॅलेटवर मतदान होतात. मग हिंदुस्थानातच ईव्हीएम का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इव्हीएमविरोधात आज विरोधकांची दिल्लीत बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठख होणार असून शिवसेनेकडून अनिल देसाई बैठकीला हजर राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.