Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागणार, रश्मी शुक्लांच्या मुद्द्यावरून राऊतांचा...

Sanjay Raut : बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागणार, रश्मी शुक्लांच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

Subscribe

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला आपले सरकार कायम ठेवण्यात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांना मोठा धक्का मिळाला आहे. पण महायुतीचे सरकार येताच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडणूक काळापुरती राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजयकुमार वर्मा यांना हटविण्यात आले असून आता पुन्हा एकदा रश्मी शुक्लांकडे महासंचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण त्यांच्या या नियुक्तीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर आता यापुढे अशा पद्धतीने बेकायदेशीर होणाऱ्या नेमणुका सहन कराव्या लागणार असल्याची जहरी टीका राऊतांनी केली आहे. (Sanjay Raut criticism Mahayuti due to Rashmi Shukla re-appointment as DG of Maharashtra Police)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 26 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, संजयकुमार वर्मा यांची जेव्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा त्यांची नियुक्ती केवळ निवडणूक काळापुरती असल्याचे आदेशात म्हटले होते. खरं म्हणजे असं होत नाही. मुळात आम्ही वारंवार रश्मी शुक्ला यांच्या नेमणुकीबाबत प्रश्न उपस्थित करून त्याबाबत वाद असल्याचे सांगत होतो. पण अडीच वर्षांपूर्वीच शुक्लांची नेमणूक बेकायदेशीररित्या झाली आणि आताही ती नेमणूक तशीच होत आहे. भविष्यात अशा बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका आणि बेकायदेशीर कृत्य अशा घटना घडत राहतील, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Assembly Election 2024 : शिंदे अन् ठाकरे 51, तर शरद पवार विरुद्ध अजितदादांचे उमेदवार 40 जागांवर भिडले; कोण ठरलं वरचढ?

तसेच, अशा बेकायदेशीर नेमणुका आता यापुढे सहन कराव्या लागणार आहेत. कारण एक सैतानी बहुमत मिळालेले सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आले आहे आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेले नाही. हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर आणि यंत्रणाचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतेही नियंत्रण नसेल. हे बेफाम सरकार असेल. त्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल. अन्य कोणाची नेमणूक होतील. याच्यावर बोलणे हे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे असले तरी आम्ही बोलत राहू. कोणाला आवडू किंवा न आवडू पण सरकारला प्रश्न विचारावे लागतील. जिथे सरकार चुकत आहे, तिथे बोट दाखवावे लागेल आणि आम्हाला मुंबई असेल, दिल्ली असेल, देशात असेल प्रसंगी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे विचारावे लागतील, असे खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -