Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले? राऊतांनी उपस्थित केला...

Sanjay Raut : आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले? राऊतांनी उपस्थित केला प्रश्न

Subscribe

राज्यात निवडणूक पार पडताच अनेक संस्थांचे सर्व्हे अहवाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्वेक्षण अहवालावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 65.02 टक्के इतके मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान काही टक्क्यांनी जास्त झाले आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण राज्यात निवडणूक पार पडताच अनेक संस्थांचे सर्व्हे अहवाल समोर आले असून यामध्ये भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्वेक्षण अहवालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले, हा संशोधनाचा विषय असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut criticism of survey report, saying that exit polls are matter of research)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 21 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येणाऱ्या आकडेवारीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये गुप्त मतदान करण्यात येत असते. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये लोक मनातली गोष्ट मांडतात असे नाही. महाराष्ट्रातही यावेळी असेच झाले आहे. त्यामुळे दोन, चार हजारांचा सर्व्हे करून कोण जिंकणार, कोण हरणार हे कसे सांगतात. हरयाणामध्येही काँग्रेस 60 जागा जिंकेल असा एक्झिट पोल आलेला. लोकसभेला मोदी 400 पार जातील अशा प्रकारचा एक्झिट पोल तयार करून घेतलेला. त्याचे काय झाले हे लोकांनी पाहिले आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानींचा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप

तसेच, लोकांनी केलेले मतदान गुप्त असते, तरीही काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण 23 तारखेला निकाल लागेल आणि 26 तारखेला महाविकास आघाडी सत्तेत येईल. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्तास्थापनेचा दावाही करू शकतो. महाविकास आघाडीच्या 160 ते 165 जागा निवडून येतील. त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेऊ नये. हे भाजपा, शिंदे गटाचे षडयंत्र असून आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा देखील संशोधनाचा विषय आहे, असे यावेळी खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राऊतांचा सत्ता स्थापनेचा दावा…

यावेळी खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावाही केला आहे. जास्त मतदान झाले म्हणजे भाजपाच्या हातात सत्तेच्या चाव्या असतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. ज्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या हातात सत्तेच्या चाव्या येतात की कुलुप येते हे 72 तासांनी ठरेल. निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाने प्रचंड पैसे वाटले, पैशाचा पाऊस पाडला. यंत्रणेचा गैरवापर केला. तरी ही निवडणूक पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेली. राज्यातील जनतेने पैशाच्या प्रवाहात वाहू न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केले, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -