…आणि एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले, अयोध्येत जायला निघाले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे तिकडच्या काही प्रमुख लोकांनी याबाबत काही प्रश्न विचारले असतील. मोदींना कांचनगिरीनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, या देशात साधू कोण आहेत. साक्षी महाराज हे साधू आहेत का?, मनुष्य हाच साधू असतो.

Sanjay Raut

नवी दिल्लीः राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. त्यांनी भूमिका का सोडली मला माहीत नाही. राज ठाकरे मनसेचे प्रमुख आहेत. त्यांनी उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांच्या विरुद्ध मराठी माणसाच्या अस्मितेसाठी एक भूमिका घेतली होती. आणि एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे तिकडच्या काही प्रमुख लोकांनी याबाबत काही प्रश्न विचारले असतील. मोदींना कांचनगिरीनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, या देशात साधू कोण आहेत. साक्षी महाराज हे साधू आहेत का?, मनुष्य हाच साधू असतो. मनुष्याचा संस्कार हा त्याला साधू बनवतो. कोणी उठतो, जटा वाढवतो आणि भगवे ध्वज आणि कपडे घातलो म्हणून त्याला साधू म्हणावं का?, साधू वृत्तीनं आणि मनानं असावं लागते. राज ठाकरेंनी अयोध्येत घर बांधलं, आश्रम घेतला, तर हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं हे राजकीय नाही. आम्ही तिथे सतत जात-येत असतो, आंदोलनापासून आमचा तिथे संबंध आहे, असंही ते म्हणालेत.

बृजभूषण हा माणूस लढवय्या

बृजभूषण यांना मी ओळखतो, बृजभूषण हा माणूस लढवय्या आहे. त्यांचे आणि आमचे संबंध, महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतो. कुस्तिगर असून लोकांमध्ये काम करणारा माणूस आहे. पैलवान आहे. अनेक आखाडे आणि कुस्तिगीर त्यांनी निर्माण केलेत. तरुण कुस्तिगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थान मिळावं म्हणून ते काम करतायत. तो माणूस मागे हटणाऱ्यांपैकी नाही, त्याला मी ओळखतो, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

प्रत्येक धार्मिक, ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून तणाव वाढवला जातोय

2024 ची तयारी सुरू आहे. पण ते अशा पद्धतीने चालू आहे की, प्रत्येक धार्मिक, ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून तणाव वाढवायचा आहे. काशी, मथुरा हा विषय महत्त्वाचा असेल, एक हिंदुत्ववादी म्हणून आम्हाला त्याचा अभिमानसुद्धा आहे. पण या देशात त्या माध्यमातून परत दंगली पेटवायच्या आणि निवडणुका लढायच्या हे दोन्ही बाजूंनी टाळावं लागेल. आपण श्रीलंकेत काय चाललंय ते पाहतोय. भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्या परिवारातील इतर कोणी असेल, अनेक हिंदुत्ववादी संघटना आम्ही सुद्धा त्यात आहोत. प्रत्येक पाऊल संयमानं आणि काळजीपूर्वक टाकावं लागेल. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी, अयोध्येत राम मंदिर उभे राहिल्यानंतर असे विषय संपवायला हवेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे, जामा मशिदीच्या खाली काय आहे, याच्यातच सगळा वेळ चाललेला आहे. आमचे शिवजी कैलास मानसरोवरावरती तपाला बसलेले आहेत. आणि कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे, हिंदुत्ववादी आहात ना मग पहिलं ते मिळवा, असा टोलाही संजय राऊतांनी मोदींना लगावलाय.


हेही वाचाः कैद्यांच्या भजन स्पर्धेचे अजित पवार आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन; कैद्यांनी चांगली पुस्तके वाचल्यास बदल निश्चित – अजित पवार