नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपाने महाराष्ट्रातील तब्बल 132 मतदारसंघांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे महायुतीचे एकूण 230 आमदार विधानसभेत निवडून आले आहेत. पण भाजपाचे हे यश देशासाठी आणि राज्यासाठी घातक असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या विजयावर भाष्य करत भाजपाकडून देण्यात येणारे शब्द फार गांभीर्याने घ्यायचे नसतात, असे म्हटले आहे. (Sanjay Raut criticism that success of BJP is dangerous for the country and the state)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले की, भाजपाला जे मोठे यश मिळाले आहे, त्याला मी पाशवी बोलतो. हे यश देशाला आणि राज्याला हानीकारक आहे. कारण यामुळे हुकूमशाही, मनमानी वाढत आहे. लोकशाहीचा पदोपदी खून होत असून भ्रष्टाचार वाढला आहे. अदानीसारखी भूत निर्माण झाली आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तर, भाजपाने कोणाला मुख्यमंत्री करायचे हे त्यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावे आणि ते लवकरात लवकर मिळावे, अशी जनतेने अपेक्षा केली असेल तर ती चुकीची नाही. सरकार यासाठी हवे आहे कारण त्यांनी जी आश्वासने दिली आहेत, जसे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, त्या आश्वासनांची पूर्ती होण्याची बहिणी वाट पाहात आहेत. कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकरी कर्जमाफ कधी होणार? याची वाट पाहात आहेत. अशा अनेक योजनांच्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार याची वाट पाहात आहेत, त्यामुळे सरकार ताबडतोब यावे, अशी आशाही राऊतांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा… Sanjay Raut : गरज सरो, वैद्य मरो… ही भाजपाची भूमिका; राऊतांचा खोचक टोला
तर, राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत खासदार राऊत म्हणाले की, ज्या देशामध्ये गौतम अदानीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो. ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे पंतप्रधान जाऊन मोदक खातात, ज्या देशामध्ये न्यायालये दबावाखाली वावरले जातात. तिथे निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्यामुळे या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? असाही सवाल त्यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला. तसेच, आम्ही डोळ्यांनी पाहिले, स्वतः अनुभवले आहे. कारण आम्ही सुद्धा फिल्डवर होतो, असे सांगत राऊतांनी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची माहिती प्रसार माध्यमांसमोर दिली. महाराष्ट्रातील एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या दहशतीच्या माध्यमातून मतदारांना कशा प्रकारे रोखत होत्या, याबाबतची पोस्ट केली. त्यामुळे यावर निवडणूक आयोगाचे काय म्हणणे आहे. राज्यात असे ठिकठिकाणी झाले आहे. त्याशिवाय यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात ठिकठिकाणी झाला आहे. त्यामुळे मतदानावार प्रभाव पडला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.