मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विक्रोळीमधील सभेत शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच यावेळी मनसेने संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची राखीव ठेवली होती. त्यानंतर आता यावर संजय राऊत यांनी विक्रोळीमधील सभेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी, खटाखट..अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत सैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत.” असे म्हणत टोला लगावला. (Sanjay Raut criticized MNS Raj Thackeray election rally in Vikhroli)
हेही वाचा : Election 2024 : अजित पवार गटाच्या जाहिरातीवर आक्षेप; टीव्हीवर दाखवण्याआधी निवडणूक आयोगाने सुचवले बदल
विक्रोळीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेसह शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. “एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली होती. खरतर मला याचे कारणच कळाले नाही. मी म्हटलं, आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण, 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत सैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. आम्ही आमचा इमान विकला नाही.” असा टोला लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही *** सारखे वागलो नाही. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू,” असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि मनसेवर टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र इतका भिकारी केला आहे आणि त्या मोदींचे आपण पाय चाटता. ते ठाकरे आहेत आणि आम्ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्राचे शत्रू फडणवीसांची पालखी वाहू नका.” अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
हेही वाचा : Supriya Sule : म्हणून मी नवरात्रीचे उपवास करत नाही; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“विक्रोळीत सध्या मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेत, आणि आता पोपट आला होता. सुपारीबाज तर इथे दोनदा येऊन गेले आहेत. हे कशासाठी आले, तर फडणवीसांच्या आदेशाने. लोकशाही निवडणूक होत असते, एकमेकांविरोधात उमेदवार उभे करतो. मात्र इथे आले महाराष्ट्रात अनेक विषय असताना बोलले कुणावर तर माझ्यावर, मी त्यांना स्वप्नात दिसतो. नरेंद्र मोदी, अमित शाह, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे.” असे म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला.