“पुण्याची हवा बदलली…”; कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

राज्यभरात ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवगर्जना यात्रेला संजय राऊत हे सुद्धा जातीने उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over Kasba by-election results

संजय राऊत यांनी आज (ता. ३ मार्च) सांगली येथे होणाऱ्या शिवगर्जना यात्रेला हजेरी लावली आहे. या शिवगर्जना यात्रेदरम्यान, संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीवरून भाजपवर टीका केली. तर पुण्याची हवा बदलत आहे, “चंद्रकांतदादा.. टोपी संभालो” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुरुवारी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा पेठ हा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी स्वतःकडे खेचून आणल्याने सध्या महाविकास आघाडीच्या गोटात जल्लोष करण्यात येत आहे.

यावेळी कसबा पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाला डावलण्यात आले का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कसब्यामध्ये कोणाला तिकीट मिळाली, नाही मिळालं याबद्दल आणि कोणत्याही जाती-धर्माबद्दल मी टीका टिपण्णी करणार नाही. निवडणुका असतात, पण कोथरुडमधून चंद्रकांत पाटील लढणार आहेत की नाही हे त्यांना एकदा विचरून घ्या, कारण पुण्याची हवा बदलली आहे. चंद्रकांतदादा टोपी संभालो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

याचवेळी त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. “हा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. कोणावर हल्ला झाला हे मी अजून पाहिले नाही. या महाराष्ट्रात हल्ली ठिकठिकाणी अनेकांना असे हल्ले आणि धमक्या दिल्या जात आहेत. राज्याचे गृहमंत्री हे गांभीर्याने घेताना दिसत नाही. अशा लहानसहान किरकोळ गोष्टींमध्ये शिवसेना कधी पडत नाही,” असे संजय राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

“आता कोणाला सनसनाटी निर्माण करायची असेल ते स्वतःवर हल्ले करून घेतात, अशी माझाही माहिती आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करतात. पण कोणावर मुंबईत हल्ला झाला असेल आणि तो राजकीय कार्यकर्ता असेल तर ती बाब पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला हवी. आमची नावे घेऊन दोन दिवस वृत्तपत्रात बातम्या येतील,” अशी टीका करत संजय राऊत यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला.


हेही वाचा – संदीप देशपांडे हल्लाप्रकरण सभागृहात, नितेश राणे आक्रमक