मुंबई : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गोटातील आमदारांवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेतील (शिंदे गट) अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण मागून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांना मंत्रीपद मिळाले असून शिंदे गटातील काही इच्छुक आमदारांना अद्यापही मंत्रीपदाबाबत कोणतेही माहिती नसल्याचे समोर येत आहे. शिंदेंच्या अनेक आमदारांनी तर याबाबत उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आणि त्याचमुळे पावसाळी अधिवेशन संपताच शिंदेंनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमदारांना भोजनाचे आमंत्रण दिले होते. काल (ता. 10 ऑगस्ट) या जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम अचानकपणे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. पण यावरून आता संजय राऊत मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे. (Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde food program for MLAs)
हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू
आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या आमदारांसाठी एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम रद्द केले असे कळले. कारण त्यांना वाटले असेल की, तिथे आमदारांच्या मंत्रिपदावरून मारामाऱ्या होतील. काल त्यांचे हेलिकॉप्टर पण उडू शकलेले नाही. त्यांच्या बाजून जनताही नाही आणि निसर्गही नाही. हा सगळा औट घटकेचा कारभार सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.
आज राऊत यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून भाष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख नेत्यांच्या मिसेसचे फ्लाइंग किस पाहिलेले आहेत, असे सांगत राऊत म्हणाले, याचे व्हिडीओ मी तुम्हाला दाखवू शकतो. राहुल गांधींनी फ्लाइंग किस केले म्हणजे काय केले. त्यांनी कोणाचा विनयभंग केला का? त्यांनी संपूर्ण संसदेत अत्यंत प्रमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. हे नव्या पिढीचे साधन आहे प्रेम व्यक्त करण्याचे. तुम्ही माझा द्वेष करा पण मी तुमच्यावर प्रेम करेल. राहुल गांधींनी मोहब्बतची दुकान उघडली आहे. त्यातील ज्या वस्तू आहेत त्यापैकी फ्लाईंग किस एक आहे. तुम्हीही फ्लाईंग किस द्या देशातील जनतेला. मणिपूरला जाऊन फ्लाईंग किस द्या. तुम्हाला कोणी रोखले?, असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.