मुंबई : विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेनेच्या 25 वर्षांच्या युतीमध्ये भगदाड पडले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. पण भाजपाने मोठी खेळ करत शिवसेना पक्षाला फोडले आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेत आले. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेनेत झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर फडणवीसांना खोटे बोलण्याचा रोग झाला असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे. शिवसेना महाविकास आघाडी सत्ता स्थापन करत आहे, हे जेव्हा फडणवीसांना कळले, तेव्हा ते केवळ पडायचे बाकी राहिले होते, असेही राऊतांकडून सांगण्यात आले. (Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis saying he has lying disease)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 15 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, एका गद्दारासाठी त्यांनी आमचे अधःपतन केले, आम्हाला अपमानित केले. ते आता असे झाले, तसे झाले सांगून मोठमोठ्या गोष्टी बोलत असतील. अडीच वर्ष त्यांनी शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केले. पण शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत आहेत. कारण मुख्यमंत्रिपदाच्या संपूर्ण चर्चेमध्ये मी होतो, असे राऊतांकडून सांगण्यात आले. तसेच, मुख्यमंत्रिपदाबाबत हे लोक कोणत्याही प्रकारची चर्चा करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रिपदावर चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितले जात होते आणि आमचे असे म्हणणे होते की जे आपले ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, अशी माहिती राऊतांनी दिली.
हेही वाचा… SS UBT Vs NCP : अजित पवार यांची सध्याची अवस्था पाहता… ठाकरे गटाचे शरसंधान
मविआच्या काळात शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता, इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री कसे करायचे? असा शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ते याबाबत म्हणाले की, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांनी काय ठरवले आणि काय ठरवले नाही, हे माझ्याइतके कोणाला माहीत नाही, असे सांगताना संजय राऊत म्हणाले की, त्या चर्चेच्या संपूर्ण प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांच्या वतीने मी स्वतः तिथे उपस्थित होतो. सुरुवातीच्या ज्या काही चर्चा होत्या त्या माझ्यामध्ये आणि शरद पवार यांच्यामध्ये होत होत्या. देवेंद्र फडणवीस यांना काहीही माहीत नसताना त्यांनी नाक खुपसू नये, असा खोचक सल्ला राऊतांनी दिला आहे.
तसेच, मविआसोबत आमचे सरकार बनत आहे हेही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हते. त्यांना जर का हे तेव्हा कळाले असते तर त्यांना धक्का बसला असता, ते कोसळता कोसळता राहिले असते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत, आमचे सरकार येत आहे, हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांना वाटले की शिवसेना काय करणार? ते तर आपल्या पायाशीच येणार. अशी त्यांची भूमिका होती, पण तसे झाले नाही. राजकारण शिवसेनेलाही येते आणि त्यांनी आमचे मुख्यमंत्रिपद नाकारून जो अपमान केला, ते मुख्यमंत्रिपद आम्ही तेव्हा घेतले. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडले हे सर्व ठीक आहे. पण शरद पवारा असतील किंवा काँग्रेस असेल यांनी हे सरकार किंवा मुख्यमंत्रिपद असेल हे पाच वर्ष टिकवण्याचा शब्द तेव्हा दिला होता. पण देवेंद्र फडणवीस यांना गेल्या अडीच ते तीन वर्षापासून खोटे बोलण्याचा रोग लागला असून यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.