अजित दादा, आमचे ऐका नाहीतर गडबड होईल!

शिवसेना खासदार संजय राऊत यांची टिप्पणी

sanjay raut slams bjp over Tripura Violence

अजित दादा, आमचे ऐका, नाहीतर गडबड होईल. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपले कुणी ऐकत नाही असे म्हणतात. पण असे होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकले तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी भोसरी येथील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात केली.

मात्र, लागलीच त्यावर खुलासा करताना संजय राऊतांनी मुद्दा मांडला. मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचे आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचे आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचे आपण? आपल्याला एकट्याने लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचे. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा ठरलं लढायचे म्हटल्यावर आपण लढू, असे देखील संजय राऊत यांनी भोसरीतील शिवसेना पदाधिकार्‍यांना सांगितले.

यावेळी संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे देखील अजित पवारांना टोला लगावला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, महापालिकेतला महापौरही शिवसेनेचा असला पाहिजे हे आपण ठरवले पाहिजे. कुणाची भीती बाळगायचे कारण नाही. भाजप काय करणार? किंवा पालकमंत्र्यांचा जास्त दरारा आहे, आपले कुणी ऐकत नाही. आपलेही ऐकणार, तुम्ही छाती पुढे करून सत्ता आहे म्हणून जा ना. कलेक्टर, पोलीस आयुक्तांकडे जाताना छाती पुढे काढून जा की आपली सत्ता आहे. तू या सत्तेचा नोकर आहेस, माझा मुख्यमंत्री वर बसलाय ही उभारी मनात पाहिजे. तुम्ही जबाबदारी घ्या, काही झालं तर मला सांगा. मी येतो इथे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

तुम्ही अजितदादांना भेटा! आम्ही तुमच्यासोबत

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असे सांगत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुम्ही अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगून शिवतारे यांना बळ दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी नाही झाली तर शिवतारे आणि अजितदादा यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.